(पुणे)
प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी शुक्रवारी तळेगाव दाभाडे येथील सदनिकेत मृतावस्थेत सापडले. महाजनी हे गेल्या काही महिन्यांपासून तळेगाव दाभाडे येथील एका सदनिकेत भाडेतत्वावर राहत होते. चांगली कथा-पटकथा, रुबाबदार, देखणे रूप असे १९७५ ते १९९० या काळात समीकरण आणि मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे प्रसिध्द अभिनेते रवींद्र ह. महाजनी (७७) यांचे आकस्मित निधन झाले आहे.
अभिनेते महाजनी हे गेल्या काही दिवसांपासून आंबी येथे एका फ्लॅटमध्ये राहण्यासाठी आले होते. दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ते राहत असलेल्या सदनिकेतून वास येत होता. या बाबतची माहिती रहिवाशांनी पोलिसांना दिली. तळेगाव पोलिसांनी धाव घेतली. सदनिकेचा दरवाजा तोडण्यात आला. महाजनी यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला होता. महाजनी यांचा मुलगा अभिनेता गश्मिर मुंबईत राहायला आहे. गश्मिरला पोलिसांनी ही माहिती दिली असून, ते तळेगाव दाभाडे येथे रवाना झाले आहेत. शविच्छेदनानंतर महाजनी यांचा मृतदेह ताब्यात देण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. महाजनी यांचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
मधुसूदन कालेलकर यांच्या ‘जाणता अजाणता’ या नाटकातून महाजनींना खऱ्या अर्थाने पहिली संधी मिळाली. शांतारामबापूंनी या नाटकाचा एक प्रयोग पाहिला आणि रवींद्र महाजनींना ‘झुंज’ या चित्रपटात मुख्य भूमिकेची संधी दिली. १९७४ साली आलेला हा चित्रपट खूप गाजला आणि त्यानंतर रवींद्र महाजनी नावाचा नवा तारा मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला. यानंतर ‘आराम हराम आहे’, ‘लक्ष्मी’, ‘लक्ष्मीची पावलं’, ‘देवता’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’, असे चित्रपटही गाजले. तसेच ‘बेलभंडार’, ‘अपराध मीच केला’ या नाटकांचे प्रयोग केले. सन १९९० नंतर चरित्र भूमिकां, दूरचित्रवाणी मालिकांमध्येही आणि ‘सत्तेसाठी काहीही’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी निर्मितीच्या आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात प्रवेश केला. २०१५ नंतर त्यांनी ‘काय राव तुम्ही’, ‘कॅरी ऑन मराठा’, ‘देऊळ बंद’, ‘पानीपत’ अशा काही चित्रपटांतूनही भूमिका साकारल्या.