(लांजा)
तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक तसेच आरोग्य क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या आणि सामाजिक बांधिलकी जोपसणाऱ्या लांजा येथील ‘युथ वेल्फेअर ऑर्गनायझेशन’ संस्थेने रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर गरजु कुटुंबांना प्रत्येकी १५०० रुपये किंमती प्रमाणे सुमारे ९७,५०० रुपये किंमतीचे ६५ कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले.
हा उपक्रम युथ वेल्फेअर ऑर्गनायझेशन संस्था गेले तीन वर्ष स्वखर्चाने राबवित आहे. संस्थेच्या या विधायक उपक्रमांबाबत जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.
“एक कदम अच्छाई की तरफ” हे ब्रीदवाक्य घेऊन युथ वेल्फेअर ही संस्था (4 जानेवारी 2019) स्थापनेपासून सतत गेली तीन वर्षे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कार्य करत आहे. संस्थेच्यावतीने शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, दिव्यांग विकास असा सर्व समावेशक पंचसुत्री हेतू उराशी बाळगून ही संस्था सतत सामाजिक कार्यात अग्रेसर राहीली आहे.
संस्थेच्या स्थापनेपासून तीन वर्ष रक्तदान शिबीर, शिक्षण घेण्यासाठी आर्थिक परिस्थिती नसलेल्या ३ विद्यार्थ्यांना दरवर्षी दत्तक घेणे, शालेय गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करणे, परदेशात नोकरीला जाणाऱ्या युवकांना आर्थिक मदत करणे, गरीब गरजू कुटुंबातील व्यक्तीचा औषधोपचार खर्च उचलणे, संस्थेने खरेदी केलेले लग्नसराईतील उपयुक्त साहित्य आर्थिक परिस्थिती कमकुवत असणाऱ्या व्यक्तींना मदत म्हणून पुरवीणे असे विविध समाज उपयोगी उपक्रम ही संस्था केवळ एका समजापुरते मर्यादित न राहता जातीभेदाच्या भिंती ओलांडून सर्वधर्म समभाव जपत सर्वसमाजातील गरजू व्यक्तींसाठी सामाजिक उपक्रम राबवत आली आहे.