(रत्नागिरी)
जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थी आहेत; पण शिक्षक नाहीत, अशी स्थिती आहे. सातत्याने शिक्षकांची होणारी जिल्हा बदली आणि भरतीला होणारा विलंब यामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवायला कोणी नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे कोकणात शाळांना टाळे लावण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. संगमेश्वर तालुक्यातील चोरवणे (ता. संगमेश्वर) येथील मराठी शाळेतील एक शिक्षक सातत्याने रजेवर असून शाळेत येत नाही. तो ताण अन्य शिक्षकांवर पडतो. त्यामुळे पटसंख्या ७१ असूनही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शनिवारी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवून चोरवणे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत शाळेला कुलूप ठोकले आहे.
शाळेत मुख्याध्यापकांसह चार शिक्षक आहेत. त्यातील एक शिक्षक वर्षभर नसल्यासारखेच आहेत. ही बाब संगमेश्वर पंचायत समितीच्या संबंधित गट शिक्षणाधिकारी यांच्या निदर्शनास पालकांनी आणून दिली. शाळेला आम्ही दुसरा शिक्षक देऊ, असे आश्वासन दिले गेले. मात्र वर्ष उलटले तरीही गटशिक्षणाधिकारी यांनी शाळेला शिक्षक दिलेला नाही. प्रशासनाच्या अशा कारभारामुळे ७१ विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. १८ ऑक्टोबर २०२३ रोजी गटशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील यांच्याकडे गावाचे सरपंच दिनेश कांबळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय शिदम, उपाध्यक्ष दीपराज कांबळे, उपसरपंच अनंत बसवणकर, माजी सरपंच दीपिका पडीलकर, मुख्य गावकर सखाराम कांबळे आदींसह ६० पालक निवेदन देण्यासाठी गेले होते. मात्र त्यानंतरही कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
या शाळेतील एक शिक्षक वारंवार रजेवर असतात. नेहमी आजारी असल्याचे कारण देतात. याबाबत ग्रामस्थांनी निवेदने देऊनसुद्धा संबंधित शिक्षकाला हजर करून घेण्याचे आदेश प्रशासन देत आहे. या शिक्षकाची प्रशासनाकडून चौकशी देखील केली गेली आहे. तरीही संबंधित गटशिक्षणाधिकारी या शिक्षकाला पाठीशी घालत आहेत, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. या प्रश्नी गटशिक्षण अधिकारी हे पालक सभेस उपस्थित देखील राहत नाहीत. विद्यार्थ्यांची व पालकांची व्यथा जाणूनदेखील घेत नाहीत. त्यामुळे २० जानेवारीपासून पालकांनी शाळेला कुलूप ठोकले आहे.
सध्या शाळेत कार्यरत तीन शिक्षक आहेत. संबंधित शिक्षक मागील दहा वर्षे दांडी मारत आहेत. गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुख यांना फोनद्वारे गावातील सरपंच व उपसरपंच यांनी संपर्क साधला होता. मात्र त्यांचे फोन कट केले जातात. ‘तुम्हाला काय करायचे ते करा’, अशा प्रकारची उत्तरे दिली जातात. जोपर्यंत शाळेत शिक्षक हजर होत नाहीत व संबंधित गट शिक्षणाधिकारी त्या शिक्षकाचा पदभार काढून घेत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे, असे सरपंच दिनेश कांबळे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.
आधीच प्राथमिक शिक्षकांना अनेक शालाबाह्य कामे असतात. तीन शिक्षकी शाळा असली तरी एखादा शिक्षक कामगिरी करता बाहेर असतो. मुख्याध्यापकांनासुद्धा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात. अशातच एक शिक्षक सतत गैरहजर राहत असेल तर दोन शिक्षकांवर शिकवण्याची संपूर्ण जबाबदारी येते. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या प्रकाराने मात्र एक चांगली शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे.