(रत्नागिरी / प्रतिनिधी)
राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना सन 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे यासाठी राज्य सरकारवर दबाव निर्माण करून सदर प्रश्न सत्वर निकाली काढण्यासाठी प्रमुख 7 मागण्यांसाठी रत्नागिरी शहरामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टी आर पी ते जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी अशी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पासून शासकीय सेवेत प्रविष्ट झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचा सर्वात जिव्हाळयाचा व महत्वाचा प्रश्न म्हणजे नवीन पेन्शन योजना (NPS) रद्द करून जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करण्याचा आहे. काही दिवसांपूर्वी म्हणजेच 14 मार्च ते 20 मार्च 2023 पर्यंत 7 दिवसांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर या प्रश्नाला जास्तीची गतिमानता प्राप्त झालेली आहे. या संपाच्या पार्श्वभूमीवर नवीन पेन्शन योजना (NPS) रद्द करून जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करणेबाबत महाराष्ट्र शासनाने त्रिसदस्यीय समिती स्थापन केलेली आहे. तसेच निधन पावलेल्या नवीन पेन्शन योजना (NPS) धारकांच्या वारसांना कुटूंब निवृत्तीवेतन व उपदान तसेच सर्व नवीन पेन्शन योजना (NPS) धारकांना उपदान मिळण्याबाबतचे शासन निर्णय झालेले आहेत. नवीन पेन्शन योजना (NPS) रद्द करून जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करणेबाबत शासनाने दि. 24 मार्च 2023 रोजी त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली असून सदर समितीला अभ्यास करून अहवाल सादर करणेसाठी 3 महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला होता. परंतू आजमितीस तीन महिने उलटूनही सदर समितीने अहवाल शासनाला सादर केलेला नाही. सदर समितीला शासनाने पुन्हा मुदतवाढ दिलेली आहे.
राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना सन 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे यासाठी राज्य सरकारवर दबाव निर्माण करून सदर प्रश्न सत्वर निकाली काढण्यासाठी प्रमुख 7 मागण्यांसाठी कामगार कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद तथा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून नवीन पेन्शन योजना (NPS) रद्द करून जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करणेबाबत गठीत समितीचा अहवाल तातडीने मिळावा, PFRDA कायदा रद्द करण्यात यावा, कंत्राटी भरती बंद करावी, खाजगीकरण थांबवावे, विविध संवर्गामधील रिक्त पदे तातडीने भरावीत, थकीत महागाई भत्ता मिळावा व आठव्या वेतन आयोगाचे गठन करावे व कामगार कर्मचारी संघटनेचे लोकशाही अधिकार सुनिश्चित करावेत या मागण्यांकडे शासनाचा लक्षवेध करण्यासाठी रत्नागिरी शहरामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टी आर पी ते जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी अशी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर रॅलीमध्ये समन्वय समितीचे कार्याध्यक्ष तथा जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष श्री. दिनेश सिनकर, निमंत्रक श्री. चंद्रकांत चौघुले, ज्येष्ठ कर्मचारी नेते मा. श्री. सुधाकरराव सावंत, मध्यवर्ती संघटनेचे कोकण विभाग संघटक, श्री. रूपेंद्र शिवलकर, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष श्री. अंकुश चांगण, सचिव श्री. दत्तात्रय क्षिरसागर, आरोग्य संघटनेचे अध्यक्ष श्री. कमलेश कामतेकर, प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष,श्री. दिपक नागवेकर, प्राथमिक शिक्षक समिती सहकार गटाचे श्री. प्रकाश काजवे, , प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा कोषाध्यक्ष श्री. चंद्रकांत कोकरे, , श्री. दिलीप महाडीक, प्राथमिक शिक्षक संघ, श्री. संतोष कांबळे, कास्ट्राईब शिक्षक संघटना, श्री. प्रशांत जाधव, प्रसिध्दीप्रमुख, श्री. रविंद्र मोहिते, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना इत्यादी पदाधिकारी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी, सदस्य तसेच कर्मचारी बंधू भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी, रत्नागिरी यांना समन्वय समितीच्यावतीने निवेदन देण्यात आले व जिल्हाधिकारी कार्यालय आवारामध्ये सदर बाईक रॅलीचा समारोप करण्यात आला.