प्रभू श्रीरामाचा अवमान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याही विरोधात प्रभू श्रीरामाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भादंवि 295-अ अन्वये गुन्हा दाखल
जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाच्या मेळाव्यात बोलताना श्रीरामाचा अवमान केला. त्यांचा अपमानास्पद उल्लेख केला. त्यामुळे नाशिकमधील काळाराम मंदिराचे मुख्य पुजारी महंत सुधीर दास महाराज यांनी नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यात आव्हाडांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक मुलाखतीत बोलताना श्रीरामाचा अवमान केला, त्यामुळे त्यांच्या विरोधात मालेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे अंधारे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मालेगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते अमन परदेशी यांनी याबाबत तालुका पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. सुषमा अंधारे यांनी एका वाहिनीला मुलाखत देताना श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा परदेशी यांचा दावा आहे. त्यांच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी भादंवि 295-अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत संबंधितांचे जबाब नोंदविल्यानंतर सुषमा अंधारे यानांही पोलिस पाचारण करणार आहेत, भारतीय पुरावा कायदा कलम 65 ब अन्वये यूट्यूबवरील क्लिप पुरावा म्हणून ग्राह्य धरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी महाराष्ट्रातील शिर्डी येथे एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की, प्रभू राम शाकाहारी नव्हते, ते मांसाहारी होते. ते म्हणाले की 14 वर्षे जंगलात राहणारा माणूस शाकाहारी अन्न शोधण्यासाठी कुठे जाणार? मात्र आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळॆ राज्यभरात वादंग उठले आहे. यावर जितेंद्र आव्हाडांनी पत्रकार परिषद घेत आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नसल्याचे म्हंटले आहे. तसेच इतिहासाचं विकृतीकरण करणं माझं काम नाही. पण मी ते जे बोललो ते ओघात बोलून गेलो, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
जितेंद्र आव्हाड बोलताना म्हणाले की, ‘अन्न पुराणी’ नावाचा पिक्चर आला आहे. 1 डिसेंबर 2023 ला. दक्षिणेतील सुपरस्टार दोघे त्यामध्ये आहेत. त्यामध्ये त्यांनी पाठांतर वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणातील श्लोक म्हणून दाखवला आहे. मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही. पण त्याही वरती मी जाऊन सांगतो, आजकाल अभ्यासाला महत्व नाही, भावनांना महत्व आहे. त्यावर मी म्हणेन, माझ्या त्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो. मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. इतिहासाचं विकृतीकरण करणं माझं काम नाही. पण मी काल जे बोललो ते ओघात बोलून गेलो. राम, प्रभू श्रीराम, ज्याला आम्ही महाराष्ट्रात पांडुरंग हरी म्हणतो. त्या रामाबद्दल बोलताना मी म्हणालो की, ते मांसाहारी होते. हा वाद मला वाढवायचा नाही. वाल्मिकी रामायणामध्ये सहा स्कंद आहेत. त्यातील अयोध्ये स्कंदेतील 52 श्लोक 102 जो आहे तो मी वाचून दाखवत नाही, कारण मला वाद वाढवायचा नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.