रत्नागिरी : मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य श्रीकांत देशपांडे यांना जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह, रत्नागिरी येथे १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली.
यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी एश्वर्या काळूशे, प्रांताधिकारी विकास सुर्यंवंशी, प्रांतधिकारी शरद पवार, प्रांताधिकारी राजश्री मोरे, आदि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे म्हणाले रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दि.१ नोव्हेंबर पासून ते ३० नोव्हेंबर पर्यंत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून जे युवा युवती दि. १जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ वर्ष पूर्ण करणार आहेत. त्यांना या विशेष मोहिमेत मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी दि. १३, १४, २७ आणि २८ नोव्हेंबर या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नाव नोंदणीसाठी विशेष मोहिम आयोजित करण्यात आली आहे.
ते म्हणाले नवमतदारांना नाव नोंदणी करण्यासाठी ही मोहिम उपयुक्त ठरणार असून दि. ३० नोव्हेंबर पर्यंत नाव नोंदणी केलेल्यांचे नाव अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात येईल. जेणे करुन त्यांना येत्या निवडणूकीमध्ये मतदानाचा हक्क बजावता येईल. त्यासाठी जे युवा-युवती १ जानेवारी २०२२ मध्ये वयाची १८ वर्ष पूर्ण करतील. त्यांनी जवळच्या मतदार नोंदणी कार्यालयात भेट द्यावी. अथवा NVSP पोर्टल वर ऑनलाईन नोंदणी करावी.
श्री. देशपांडे म्हणाले मतदार यादीमधून मृत नातेवाईंकाचे नाव वगळण्यासाठी, एकच नाव दोन ठिकाणी नोंदविले असल्यास त्यातील एक नाव वगळण्यासाठी अर्ज क्र.७ भरुन द्यावा. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेत स्थळावर प्रसिध्द झालेल्या आणि मतदार नोंदणी कार्यालयामध्ये प्रकाशित झालेल्या प्रारुप यादीमध्ये मतदारांनी आपले नाव, जन्म तारीख, वय, छायाचित्र ओळखपत्र क्रमांक, लिंग, पत्ता, मतदार संघ, नातेवाईकाचे नाव, त्यांच्याशी असलेले नाते आदि बाबी मतदार यादीत अचूक आहेत याची पडताळणी करावी. त्याबाबत काही बदल करावयाचे असल्यास त्यासाठी नमुना नं.८ भरुन मतदार नोंदणी कार्यालयात अथवा ऑनलाईन सादर करावा.
00000