(संगलट-खेड/ इक्बाल जमादार)
प्रधानमंत्री आवास योजना २०२१-२०२२ या वर्षात महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारत देशात खेड तालुक्यातील वडगाव ग्रामपंचायतीने विक्रम केला असून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत केवळ २८ दिवसांमध्ये गरजवंत लाभार्थ्याला घर बांधून दिले आहे. यापूर्वी हा विक्रम उत्तर प्रदेशातील एका ग्रामपंचायतीने केला होता. त्या ठिकाणी ८० दिवसात घर बांधून देण्यात आले होते. मात्र आता महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातील वडगाव ग्रामपंचायतीने एका बेघराला देशातील सर्व रेकॉर्ड ब्रेक करत केवळ २८ दिवसांमध्ये घरकुल बांधून देशात नवीन विक्रम नोंदवला आहे.
खेड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतीचे, ग्रामसेविकेचे अभिनंदन केले आहे. देशाचे प्रधानमंत्री देखील याची दखल घेणार असल्याचे समजते आहे.
देशातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील लोकांसाठी आणि बेघर असणाऱ्यांसाठी प्रधानमंत्री आवास योजना देशभर राबवली जाते. शासकीय नियमांप्रमाणे ९० दिवसांच्या कालावधीत लाभार्थ्यांना घरकुल बांधून द्यायचे असतात. या पूर्वी सदर योजना प्रभावीपणे राबवून ८० दिवसांमध्ये उत्तर प्रदेश येथील एका ग्रामपंचायतीने लाभार्थ्याला घर बांधून दिले होते. त्यावेळी देशात या ग्रामपंचायतीने विक्रम नोंदवला होता, मात्र २०२१-२०२२ या वर्षात महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील वडगाव ग्रामपंचायतीने त्याहीपेक्षा ही योजना प्रभावीपणे राबवून नवीन रेकॉर्ड तयार केले आहे. केवळ २८ दिवसांमध्ये वडगाव ग्रामपंचायती मधील आर्थिकदृष्टया दुर्बल आणि बेघर असणाऱ्या धोंडीराम लक्ष्मण सकपाळ या लाभार्थ्याला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत टुमदार घर बांधून दिले आहे.
हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशात अव्वल विक्रम झाला असून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि त्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
सर्वांच्या सहकार्यामुळे हा विक्रम – सुचित्रा कुंभार, ग्रामसेवक वडगाव
प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी जिह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, खेड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण राबवली वडगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील धंदीराम सकपाळ हे बेघर होते. तसेच आर्थिकदृष्टया दुर्बल होते. त्यांना लवकरात लवकर निवाऱ्याची गरज होती. ग्रामपंचायती मधून त्यांचे या वर्षी घरकुल मंजूर झाल्यानंतर आपण वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्राधान्याने शासकीय बाबींची तात्काळ पूर्तता करत त्यांचे घरकुल लवकरात पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले, धोंडीराम सकपाळ यांनी देखील प्रामाणिकपणे घरकुल उभारण्यासाठी प्रयत्न केले आणि अशा प्रकारे सगळ्यांच्या सहकार्याने बेघर असलेल्या धोंडीराम यांचे घरकुल अवघ्या २८ दिवसांच्या आत पूर्णत्वास गेले. योजनेची पूर्तता सर्व ऑनलाईन पद्धतीने असल्याने देशात सर्वात लवकर या योजनेअंतर्गत पूर्ण झालेले हे घरकुल ठरले आणि हा नवीन विक्रम देशात झाला याचे मला समाधान वाटते असे वडगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका सुचित्रा कुंभार म्हणाल्या.
ग्रामसेवक सुचित्रा कुंभार यांचा पंचायत समितीत सत्कार
केवळ २८ दिवसांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एका बेघर लाभार्थ्यांचे घरकुल पूर्णत्वास नेहून देशात तालुक्याचे, जिल्ह्याचे, आणि महाराष्ट्राचे नाव मोठे केल्याबद्दल खेड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री पाटील, आणि सर्व अधिकाऱ्यांनी वडगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका सुचित्रा कुंभार यांचा सत्कार केला.