(मुंबई )
मुंबईकरांच्या प्रश्नासाठी मुंबई काँग्रेस आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो आंदोलन केले. तसेच त्यांनी ‘नफरत छोडो, भारत जोडो और मोहब्बत बाटो‘ हा संदेश देशाला दिला. आता राहुल गांधी यांच्या जन्मदिनी आपण मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये “मोहब्बत कि दुकान” उपक्रम सुरु करणार आहोत. येणाऱ्या मुंबई महापालिका, विधानसभा व लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला प्रचंड मोठे यश मिळवून देणार असल्याची घोषणा मुंबई कॉंग्रेसच्या नवनिर्वाचित अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केली.
मुंबई कॉंग्रेस कार्यालयात झालेल्या एका कार्यक्रमात वर्षा गायकवाड या बोलत होत्या.त्या पुढे म्हणाल्या की, मला मंत्री म्हणून अशोक चव्हाण आणि नंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी संधी दिली. माझ्या वडिलांकडून भाई जगताप यांनी पदभार घेतला आणि त्यांच्याकडून नुकताच मी पदभार घेतला आहे. ही भावाकडून बहिणीला मिळालेली भाऊबीज आहे असे मी समजते. आमचे कौटुंबिक नाते आहे. काँग्रेस जे बोलते तेच करते. आज महिला सक्षमीकरणाच्या फक्त गप्पा मारल्या जात आहेत .पण मुंबईत चर्नीरोड येथील वसतीगृहात मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. मीरा रोड येथे हत्याकांड घडले. तर काल परवा लोकलमध्ये एका मुलीवर अत्याचाराची घटना घडली. यावर सरकार कारवाई करताना दिसत नाही. मी त्याचा निषेध करून पुढील काळात या सर्व पीडित महिलांसाठी लढणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला वर्षा गायकवाड यांच्यासह माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप व संजय निरुपम, माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर व प्रिया दत्त,माजी मंत्री सुरेश शेट्टी, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, आमदार अस्लम शेख,अमीन पटेल व झिशान सिद्दीकी, माजी मुंबई काँग्रेसचे सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.