(नवी दिल्ली)
अयोध्येतील तीन मजली राममंदिराच्या तळ मजल्याचे काम डिसेंबरच्या अखेरीस पूर्ण होईल. प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी रोजी होणार असून, अयोध्येतील भव्य मंदिरात रामलला विराजमान होणार आहेत, अशी माहिती मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिली.
प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतील. मात्र, पंतप्रधान कार्यालयाकडून शिक्कामोर्तब झाले नसले, तरी ते लवकरच होईल, असे मिश्रा यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र समिती जलाभिषेक सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदींना औपचारिकपणे निमंत्रित करेल आणि या सोहळ्यादरम्यान रामललाची मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात स्थापन केली जाईल. 14 जानेवारी रोजी होणार्या मकर संक्रांतीनंतर रामललांच्या अभिषेकाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.
निर्धारित अवधीतच मंदिराचे बांधकाम पूर्ण होणार आहे. किमान हजार वर्षे धक्काही लागणार नाही, अशा प्रकारे राममंदिराची बांधणी करण्याची योजना आम्ही आखली असल्याचे नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले. दरवर्षी रामनवमीच्या दिवशी गर्भगृहातील देवतेच्या कपाळावर सूर्याची किरणे क्षणोक्षणी पडतील, असे यंत्र मंदिराच्या शिखरावर बसवण्याचे काम सुरू आहे. हे यंत्र बंगळुरूत तयार केले जात आहे आणि त्याच्या संरचनेवर वैज्ञानिक देखरेख करीत आहेत.
ठळक मुद्दे
– प्राणप्रतिष्ठेचे थेट प्रक्षेपण लोकांना घरीच पाहता येणार
– भाविकांना दर्शनासाठी मिळणार 15 ते 20 सेकंद
– मंदिराच्या बांधकाम, पायाभरणीत सापडल्या प्राचीन मूर्ती, कलाकृती- यामध्ये खांब, मूर्ती, शिलालेख यांचा समावेश आहे.
– प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातील निमंत्रितांची प्राथमिक यादी 10 हजार जणांची