रत्नागिरी : जिल्हा परिषदेतील वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांच्या अपवादात्मक परिस्थितीत प्रशासकीय दृष्टिने प्रतिनियुक्ती करावयाच्या असतील तर त्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विभागीय आयुक्त यांच्या पूर्व परवानगीने करणेबाबत नमुद असल्याने अशा प्रकारे पूर्व परवानगीशिवाय बदल्या करण्यात आलेले सर्व आदेश विभागीय आयुक्त कोकण विभाग यांनी रद्द केले आहेत. त्यामुळे त्याचा फटका जिल्हा परिषदेतील वर्ग ३ व वर्ग ४ मधील कर्मचाऱ्यांना बसला असून, या कर्मचाऱ्यांना आपल्या मूळ जागी हजर होण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत.
जिल्हा परिषद रत्नागिरी अधिनस्त सर्व वर्ग ३ व वर्ग ४ मधील जे कर्मचारी अशा प्रकारे बदल्यांना पर्याय म्हणून प्रतिनियुक्ती / कामगिरी / प्रशासकीय सोयीसाठी आठवड्यातील काही दिवस आदी मार्गाने मूळ नेमणूकीच्या ठिकाणात विभागीय आयुक्त कोकण विभाग यांचे पूर्व परवानगीशिवाय बदल करण्यात आलेले आहेत. सदरील सर्व आदेश विभागीय आयुक्त कोकण विभाग यांनी सुचित केलेनुसार रद्द झाले आहेत. या संदर्भात सर्व खातेप्रमुखांना याव्दारे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्पष्ट निर्देश देताना, अशा सर्व कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती / कामगिरी / प्रशासकीय सोयीसाठी आठवडयातील काही दिवस कामगिरीवर कार्यरत कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती दिनांक ३० सप्टेंबर अखेर रद्द करुन त्यांना त्यांच्या मुळ आस्थापनेच्या ठिकाणी रुजू होणेसाठी आदेशित करावे व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सोबत दिलेल्या नमुन्यामध्ये सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करावा, असे सूचित केले आहे.
सदरबाबत विलंब किंवा टाळाटाळ केल्यास सबंधितांना शिस्तभंग विषयक कारवाईला सामोरे जावे लागेल याची नोंद घ्यावी. तसेच ज्या विभागांना कार्यालयीन कामकाजाकरिता कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. त्या संबंधित खातेप्रमुखांनी संबंधित कर्मचारी यांचे प्रतिनियुक्तीचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे शिफारशीसह विभागीय आयुक्त, कोकण विभाग मुंबई यांचेकडे सादर करणेचा आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या आदेशाने या आधी बदल्या करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसला असून, कर्मचारी वर्गात नाराजीचे वातावरण आहे.