(निवोशी-गुहागर / उदय दणदणे)
गावात कायदा,सुव्यवस्था व जातीय सलोखा राखणे यात पोलीस पाटील यांचे फार मोठे योगदान असते. प्रशासन व जनता यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणजे पोलीस पाटील होय. वेळप्रसंगी पोलीस पाटील यांना २४ तास सतर्क राहावे लागते. अनेक वेळा आर्थिक समस्याला सामोरे जावे लागते. अशा विविध समस्या सध्या गाव पोलीस पाटील यांच्यासमोर उभ्या आहेत. त्यामानाने पोलीस पाटील यांना हव्या असलेल्या शासकीय सोयी सुविधा लाभ मिळत नाहीत. आणि त्या मिळाव्यात म्हणून गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या प्रमुख मागण्यांसाठी पाठपुरावा सुरू आहे. महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ कार्यक्षेत्र – रत्नागिरी जिल्हा वतीने तालुका स्तरावर लोकप्रतिनिधींना निवेदन देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले असून महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ यांच्या धोरणेनुसार गुहागर तालुका पोलीस पाटिल यांच्यावतीने नुकतीच चिपळूण येथे दिनांक – ८ डिसेंबर २०२२ रोजी गुहागर तालुका आमदार भास्कर जाधव यांची संघटनेच्या वतीने भेट घेऊन मागणी संदर्भात निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात प्रामुख्याने पुढील मागण्यांची आग्रही मागणी करण्यात आली आहे. त्यात पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ होऊन ते किमान १८००० (अठरा हजार) मिळावे, निवृत्तीचे वय ६५ वर्ष करण्यात यावे, कार्यकाळ सेवा निवृत्तीनंतर पाच लाख ठोस रक्कम मिळावी, शिवाय ग्राम पोलीस अधिनियमात दुरुस्ती करण्यात प्राधान्य द्यावे, नूतनीकरण पहिल्या पाच वर्षां नंतर पुढे कायमचे बंद करण्यात यावे, ग्रह व महसूल विभाग पद भरतीत पोलीस पाटलांना ५℅ आरक्षणाचा लाभ मिळावा, पोलीस पाटलांना पाच लाखाचा विमा उतरण्यात येऊन तो शासनामार्फत भरण्यात यावे, पोलीस पाटील कुटुंबीयांना शासनाकडून मेडिक्लेम मिळावा, स्टेशनरी व प्रवास भत्ता म्हणून दरमहा ३००० हजार वेतन सोबत मिळावे, अशा विविध मागण्यांसाठी आमदार भास्करराव जाधव यांची भेट घेण्यात आली. जेणेकरून नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात पोलीस पाटील यांच्या प्रलंबित मागण्यांचा प्रामुख्याने विचार होईल, अशी अपेक्षा ठेऊन ही महत्वपूर्ण भेट घेण्यात आली.
सदर प्रसंगी गुहागर तालुका पोलीस पाटील अध्यक्ष-सुधाकर खेतले, उपाध्यक्ष-स्वप्नील बारगोडे, सदस्य -विशाल बेलवलकर, चिपळूण-गुहागर उपाध्यक्ष-महेश भाटकर, सचिव-अरविंद पड्याळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.