(मुंबई)
राज्यातील १८,३३१ जागांसाठी होणा-या पोलिस भरतीसाठी अर्ज करण्याचा काल शेवटचा दिवस आहे. सात वर्षांपासून शासकीय मेगाभरती निघाली नसल्याने पोलिस भरतीसाठी १८ लाख अर्ज आले आहेत, त्यामुळे पोलिस भरती हे अनेकांसाठी दिवास्वप्न ठरणार आहे.
राज्यात जवळपास ७५ हजार नोकरभरती करण्यात येणार असून त्यामध्ये १८ हजार ३३१ जांगांसाठी पोलिस भरती करण्यात येणार आहे. गेल्या ६ ते ७ वर्षानंतरची एवढ्या मोठ्या प्रमाणातील ही पहिलीच भरती असल्याने मुलांनी जोरदार तयारी सुरू केल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी मैदानातच मुले व्यायाम करत आहेत. काहीही होऊ दे, पण आता यावर्षी नोकरी मिळवायचीच, असा संकल्प करून मैदानावर ही मुले घाम गाळत आहेत.
दिर्घ काळानंतर भरती सूरू झाल्याने स्पर्धा मोठी असून या भरतीसाठी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, नाशिक अशा जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक अर्जदार आहेत. या भरतीसाठी अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस आहे. अनेक तरुण-तरुणींनी जात संवर्ग, सोयीचा जिल्हा, ज्याठिकाणी स्पर्धक जास्त नसतील याचा अंदाज घेऊन दोन ते तीन ठिकाणी अर्ज भरले आहेत. त्यांना तिन्ही ठिकाणचे प्रवेशपत्र मिळणार आहे. त्यापैकी कोणत्याही एका केंद्रावर त्याला परीक्षा देता येणार आहे.
जानेवारीत सर्व उमेदवारांची एकाचवेळी सुरु होणार मैदानी परीक्षा, फेब्रुवारी महिन्यात एकाचवेळी राज्यातील विविध केंद्रावर होईल लेखी परीक्षा होणार आहे. मैदानी चाचणीत किमान ४० टक्के गुण अपेक्षित असून, एका जागेसाठी १० जणांची होणार लेखी परीक्षेला निवड होणार आहे.
मिरा-भाईंदर व पिंपरी-चिंचवड ही आयुक्तालये वाढल्यामुळे यावर्षी १८ हजार ३३१ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर तृतीयपंथीयांसाठी पर्याय उपलब्ध करण्यात आला होता. मुंबईतही सात हजार पदांसाठी भरती होत आहे. पोलीस शिपाई, चालक व राज्य राखीव पोलीस दल या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.