(मुंबई)
निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या राज्यातील १६३ पोलिस निरीक्षकांना संवर्ग मिळूनही त्यांना अद्याप पदोन्नती देण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात या अधिका-यांच्या संवर्गासाठी म्हणजे पसंतीच्या ठिकाणी नेमणुकीसाठी अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर १५ दिवसांत या अधिका-यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण आता राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचे कारण सांगत गृह विभागाने ही पदोन्नती पुन्हा रखडवली आहे.
राज्यातील १६३ पोलिस निरीक्षकांचा १० ते १५ वर्षांचा कालावधी संपल्यानंतर सहाय्यक पोलिस आयुक्तपदी किंवा उपाधीक्षकपदी वर्णी लागणे अपेक्षित होते. मात्र त्यांना अद्यापही पदोन्नती मिळाली नाही. तसेच पदोन्नतीच्या प्रतिक्षेत असलेल्या या अधिका-यांपैकी काही अधिकारी आता निवृत्तही झाले आहेत. पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या या अधिका-यांना मात्र सहाय्यक पोलिस आयुक्तपदाचे वेतन मिळत आहे.
पोलिस अधिका-यांच्या पदोन्नतीबाबत राज्य सरकार उदासीन असल्याचा आरोप काही अधिका-यांनी केला आहे. तसेच अधिक विलंब केल्यासआपण न्यायालयाचे दरवाजे ठोठवू असे त्यांनी सांगितले आहे. पदोन्नती मिळूनही राज्य सरकारने त्यावर कोणतीही कार्यवाही केली नसल्याने पोलिस दलातून नाराजी व्यक्त केली जात आहे.