(नवी दिल्ली)
बृजभूषण सिंह यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या दिल्ली पोलिसांनी दोन महिला पैलवानांकडून लैंगिक शोषणाचे पुरावे मागितले आहेत. पुरावे म्हणून दिल्ली पोलिसांना या पैलवानांना फोटो, ऑडिओ आणि व्हिडीओ सादर करण्यास सांगितले असून यामुळे त्यांच्या आरोपांना पुराव्यांचा दाखला मिळू शकतो, असा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. पोलिसांनी कुस्तीपटूंना भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांनी जवळ घेतल्याचे फोटो देखील पुरावे म्हणून सादर करण्यास सांगितले आहे. यामध्ये आधी दोन महिला कुस्तीपटूंनी २१ एप्रिल रोजी नवी दिल्लीमधील कनॉट प्लेस पोलिस स्थानाकात बृजभूषण सिंह यांच्याविरोधात लैंगिक शोषण आणि गैरवर्तनाची औपचारिक तक्रार नोंदवली होती.
दिल्ली पोलिसांनी महिला पैलवानांना सीआरपीसीच्या कलम ९१ अंतर्गत नोटिसा पाठवल्या, ज्यावर त्यांना एका दिवसात उत्तर द्यावे लागले. दिल्ली पोलिसांनी या घटनेचे व्हिडिओ पुरावे मागवले आहेत. त्याचवेळी, दुसऱ्या तक्रारीत असे म्हटले आहे की, पदक समारंभात बृजभूषण सिंहने त्या कुस्तीपटूला १० ते १५ सेकंद जबरदस्तीने मिठी मारली होती. यावेळी बृजभूषण यांनी आक्षेपार्ह ठिकाणी हात ठेवला. पोलिसांनी घटनेचा फोटो मागवला आहे. पोलिसांनी तक्रारदार महिलांकडून घटनेची तारीख आणि वेळ, त्यांनी फेडरेशनच्या कार्यालयात घालवलेली वेळ याबद्दल माहिती मागवली आहे.
१५ जून रोजी आरोपपत्र दाखल करणार
१५ जून रोजी आरोपपत्र दाखल करता येईल या दृष्टीने पोलिस पुरावे गोळा करण्यात व्यस्त आहेत. दरम्यान, खेळाडूंकडून लैंगिक शोषणाचे फोटो आणि व्हिडिओ मागवण्यात येत आहेत. यापूर्वी या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या क्रीडा मंत्रालयाच्या निरीक्षण समितीनेही महिला कुस्तीपटूंकडून असेच पुरावे मागवले होते. एका महिला कुस्तीपटूने २०१६ ते २०१९ दरम्यान बृजभूषणने अशोका रोड येथील अधिकृत निवासस्थानी भारतीय कुस्ती महासंघाच्या कार्यालयात तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार केली होती.