( मुंबई )
पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या सोमवारी गृह विभागाने बदल्या केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पुन्हा बदल करण्यात आले. याबाबत गृह विभागाने मंगळवारी नव्याने सुधारित बदल्यांचे आदेश काढले असून दोन पोलिस उपायुक्तांच्या नियुक्तीबाबत स्वतंत्रपणे आदेश काढण्यात येणार असल्याचे या आदेशात नमूद आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत एकदा आदेश जारी केल्यानंतर त्यामध्ये पुन्हा बदल केल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे..
गृह विभागाच्या सोमवारच्या आदेशानुसार, ठाणे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त सुनील लोखंडे यांची नागपूरला बदली करण्यात आली होती. मात्र, मंगळवारी गृह विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, लोखंडे यांची ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अगोदरच्या बदल्यांमध्ये ठाणे एसीबीची सूत्रे परिमंडळ चारचे (उल्हासनगर) पोलिस उपायुक्त प्रशांत मोहिते यांच्याकडे सोपवण्यात आली होती. तर, परिमंडळ दोनचे (भिवंडी) पोलिस उपायुक्त योगेश चव्हाण यांची नवी मुंबई पोलिस आयुक्तालयामध्ये बदली करण्यात आली होती.
मात्र, गृह विभागाच्या नव्या आदेशामध्ये पोलिस उपायुक्त प्रशांत मोहिते आणि योगेश चव्हाण यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या पदस्थापनेबाबत स्वतंत्रपणे आदेश काढण्यात येतील, असे नमूद आहे. तर, कोल्हापूर येथील अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांची फोर्स वनच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, मंगळवारच्या आदेशानुसार त्यांची नियुक्ती नवी मुंबई पोलिस आयुक्तालयामध्ये करण्यात आली आहे. पालघर येथील अपर पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांची अगोदर सोलापूर शहर येथे नियुक्ती झाली होती. मात्र, आता त्यांची नियुक्ती मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयामध्ये करण्यात आली आहे.