(मुंबई)
माजी परिवहन मंत्री अनिल परब यांनी दापोली येथे विभास साठे यांच्याकडून मे २०१७ मध्ये शेतजमीन विकत घेतली, त्यावर अनधिकृतरित्या रिसॉर्ट बांधले. २०१९-२० आणि २०२०-२१ या दोन्ही वर्षांची घरपट्टी परब यांनी स्वतःच्या खात्यातून भरली. स्वतःच्या नावाने पावती घेतली. वीजमीटरही त्यांनी मार्च २०२० मध्ये स्वतःच्या नावावर घेतले. हे रिसॉर्ट जानेवारी २०२१ मध्ये त्यांनी सदानंद कदम यांना विकले. त्यानंतर मार्च २०२१ मध्ये रिसॉर्ट सदानंद कदम यांच्या नावाने ट्रान्स्फर झाले, अशी माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोमय्या यांनी पोलिसांच्या अहवालाच्या आधारे आता पुन्हा एकदा आरोप केले.
दापोली येथील साई रिसॉर्ट घोटाळ्याचा हिशोब परब यांना द्यावाच लागणार असा दावा करत सोमय्या म्हणाले की, हे रिसॉर्ट बांधण्यासाठी सुमारे सव्वादहा कोटी रुपये खर्च झाला, तो परब यांनीच केला आहे, असे ईडीनेही म्हटले आहे. सोमय्या म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी त्यांना साई रिसॉर्टमधील घोटाळ्याची संपूर्ण माहिती देणारे पत्र लिहिले आहे. या पत्रात माजी कॅबिनेट मंत्री परब यांच्याविरोधात तीन एफआयआर नोंदवल्याची माहितीही देण्यात आली आहे.
परब यांनी सोमय्या यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा करण्याचे जाहीर केले होते. परंतु परब यांनी त्यांना १०० कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा करणारी कोणतीही नोटीस पाठवलेली नाही, असे सोमय्या म्हणाले.