( संगमेश्वर /प्रतिनिधी )
गणेशोत्सवासाठी मुंबईकरांचे कोकणात आगमन सुरू झाले आहे. गणेश उत्सव शांततेत पार पाडावा यासाठी पोलीस विभाग सज्ज झाला असून कोणत्याही ठिकाणी अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. संगमेश्वर पोलीस पेट्रोलिंग करताना आरवली दरम्यान रस्त्याच्या बाजूला एक बॅग सापडली. या बॅगेमधील सर्व साहित्यसह पोलिसांनी शोध घेऊन बॅग मालकाला परत केली.
पोलीस हेडकॉन्स्टेबल शिंदे (चिपळूण), पोलीस हेडकॉन्स्टेबल पाटील (म.पो केंद्र आंबा) हे महामार्गावर पेट्रोलिंग करताना आरवली दरम्यान रस्त्याच्या कडेला एका बेवारस बॅगकडे त्याची नजर गेली. रस्त्याच्या बाजूला गाडी थांबवून बॅगच्या आसपास पाहिले. त्यानंतर पोलिसांनी सापडलेली बेवारस बॅग आरवली येथील वाहतूक व जन सुविधा केंद्रात जमा केली. तेथील पोलिसांनी बॅगेंमधील आधारकार्ड वरून बॅग मालकाचा शोध घेतला. संगमेश्वरातील कुचांबे काजवेवाडी येथील निलेश भिकाजी राक्षे यांची ती बॅग होती. या बॅगेमध्ये वीस हजार रुपयांची रक्कम, दोन मोबाईल, कपडे, महत्वाची कागदपत्रे असे सर्व साहित्य होते. अंदाजे बँगेमध्ये ५० हजार रुपयांचा ऐवज होता. राक्षे यांना माहिती दिल्यानंतर ते वाहतूक व जन सुविधा केंद्र येथे पोहोचले. पोलिसांनी सर्व साहित्यसह निलेश राक्षे यांना त्यांची बॅग परत केली. यावेळी पो.उ.नि. श्री.साळवी (जयगड पो.ठाणे ), पोलीस कॉन्स्टेबल अतुल निवडु़ंगे (संगमेश्वर पोलीस, ठाणे ) होमगार्ड मोहिते व तसेच ग्रामविकास अधिकारी श्री. शिगवण (आरवली) आदी उपस्थित होते. या स्वार्थी जगात अजूनही प्रामाणिकपणा कायम आहे, हेच या घटनेतून अधोरेखित होते. पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.