( संगमेश्वर / प्रतिनिधी )
चिपळूण तालुक्यातील पोफळी हायस्कूलचे मातृभूमी परिचय उपक्रमांतर्गत एक निवासी शिबीर नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही गावात संपन्न झाले . दुपारी चार वाजता स्थानिक वाहतूक व्यवस्थेने अमर्यादित वीज आणि पाणी उपलब्ध असलेल्या ‘ पोफळी’ गावातील शिबिरातील सहभागी मुले पोहोचली सिंधुदुर्ग मधील अत्यंत मर्यादित सुविधा असणाऱ्या ‘ चाफेड’ गावात! दिवसातून एखाद दोन वेळेलाच बस, मोबाईल नेटवर्क नाही अशा अनेक असुविधांच्या पार्श्वभूमीवर ‘ खेड्या मधले घर कौलारू ‘ पाहताना त्या घराचे ओटी,पडवी, माजघर ,खळे , परसाव, खुंट्या, गडगा अशा नवीन शब्दांचा आनंद घेत आणि जांभ्या दगडातील पाण्याची गोड चव घेऊन मुलांनी एक छोटा काजू उद्योग प्रकल्प समजून घेतला .
तळेबाजार येथील एका मोठ्या कार्यालयातील निवास, न्याहरी,भोजन,व्यवस्था अनुभवताना तेथील व्यवस्थापक माणसांकडून मुलांनी ‘ कोकणची माणसं साधी, भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी’ हा अनुभव प्रत्यक्ष घेतला . नियोजनाप्रमाणे माणगाव येथील दत्तस्थान आणि टेंबे स्वामी महाराजांचे जन्मस्थान आणि दृष्टांत दर्शनाची गुहा असं सारं काही दाखवताना महाराजांचे कार्य,चातुर्मासाचे व्रत,विपुल ग्रंथ संपदा इत्यादी समजून घेताना प्रसादाचे भोजन झाल्यावर स्वतःचे ताटवाटी स्वतः स्वच्छ करणे, अन्न न टाकण्याचे संस्कार आणि जबाबदारी याचा अनुभव घेऊन देवभूमी देवबाग या कर्ली नदी – खाडी आणि समुद्र किनारा याचा संगम होणाऱ्या भौगोलिक ठिकाणी मुलांनी ही रचना समजून घेतली.
दैनंदिन भोजन व्यवस्थेत कोकणातील पाण्याची चव उतरलेला भात जेवताना कोकणच्या लोकांचे मुख्य अन्न भात असे का आहे , हे मुलांनी अनुभवले. तिसऱ्या दिवशी विजयदुर्ग पाहताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीला सरखेल कान्होजी आंग्रे, तुळोजी आंग्रे यांच्या अफाट कर्तुत्वाने दिलेले मूर्त स्वरुप म्हणजे सागरी आरमाराचा प्रमुख किल्ला अर्थात स्वराज्याच्या आरमाराची राजधानी या बाबत विस्तृत माहिती समजून घेऊन परतीच्या मार्गावर अनायसे चालू असलेल्या ‘ छोट्या बयोची मोठी स्वप्न ‘ मालिकेतील कलाकारांना भेटून दुपारी ओगले फूड प्रोडक्ट्स येथे मुलांनी फलोत्पादन आणि फळ प्रक्रिया प्रकल्प उपेंद्र ओगले यांचे कडून समजून घेतला. आंबा फणस काजू आवळा कोकम जांभूळ इत्यादींवर प्रक्रिया कशी होते , हे समजून घेतले आणि सायंकाळी कुणकेश्वर,देवगड पवनचक्की व तेथील रॉक गार्डन असा आनंद घेतला .
देव दीपावली निमित्त भरणी गावातील यात्रा याचा अनुभव संपूर्ण रात्रभर जागून घेताना मुलांनी ग्रामीण भागातील संस्कृती आणि उत्तररात्री ‘ दशावतार ‘ सारख्या कोकणच्या माणसांनी जपलेल्या कला परंपरेचा अनुभव प्रत्यक्ष घेतला. स्वतःची वेशभूषा रंगभूषा स्वतः करणारे हौशी कलाकार,स्त्रियांच्या भूमिका करणारे न ओळखू येणारे पुरुष कलाकार अशी दशवतराची अनेक वैशिष्ट्ये मुलांनी प्रत्यक्ष अनुभवली. संपूर्ण शिबीर कालावधीत मुलांनी पाठ्यपुस्तकातील कवितेमधील निळी निळी खाडी, हिरवी हिरवी झाडी, माडांची उंची जवळून मापवा अशा शब्दांचे अर्थ प्रत्यक्ष अनुभवातून समजून घेतला.कोकणी माणसाच्या मनाचा वागण्याचा मोठेपणा आणि आपलेपणाची वृत्ती अनुभवली . या आगळ्यावेगळ्या शिबीरात आपल्याला अनेक अविस्मरणीय अनुभव आल्याचे सहभागी विद्यार्थ्यांनी सांगितले .