(मुंबई)
पोक्सो अर्थात महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाला बालकांचा लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण अधिनियम, २०१२ ते कलम ४४ अन्वये तसेच बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा, २००५ च्या कलम १०९ अन्वये या दोन्ही कायद्याअंतर्गत दाखल प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी कोकण विभागातील ६ जिल्ह्यांच्या विभागीय बैठकीचे आयोजन २२ जून रोजी मुंबईत करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष ॲड. सुशीबेन शहा यांनी दिली आहे.
या दोन्ही कायद्यांच्या अंमलबजावणी आणि देखरेखीसंदर्भात कोकण विभागातील ६ जिल्ह्यांतील बाल कल्याण समिती सदस्य, बाल न्याय मंडळाचे सदस्य, बालगृहांचे अधीक्षक, जिल्हा बाल संरक्षण युनिट व विशेष बाल संरक्षण युनिटचे प्रतिनिधी जिल्हा महिला व बाल विकास विभाग, परिविक्षा अधिकारी, चाईल्ड लाईन व खाजगी स्वंयसेवी संस्थाचे (NGO) प्रतिनिधी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रतिनिधी या सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणा यांची ही एकत्रित बैठक असेल. या बैठकीत ज्या सूचना, शिफारशी सहभागी तज्ज्ञांकडून सुचविल्या जातील त्या राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत. या शिफारशींसंदर्भात कालबद्ध पद्धतीने कारवाईचा अहवालही मागविण्यात येणार आहे.
अशा प्रकारे राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या विभागीय मुख्यालयांमध्ये आगामी कालावधीत बैठका आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती ॲड. सुशीबेन शहा यांनी दिली.