संगमेश्वर/ प्रतिनिधी
शिक्षण क्षेत्रात शास्वत काम करुन शिक्षण विद्यार्थीभिमुख करण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अरविंद तोडकरी यांनी व्यापारी पैसा फंड संस्था, संगमेश्वरच्या कलादालनाला भेट देवून कलाकृती घडविणाऱ्या कलाकारांसह कलादालन साकारण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या माजी विद्यार्थी आणि देणगीदारांना धन्यवाद दिले. येथील कलाकृती पाहून नवी उर्जा मिळते असे प्रतिपादन तोडकरी यांनी यावेळी केले.
व्यापारी पैसा फंड संस्थेचे उपाध्यक्ष किशोर पाथरे , प्रशालेचे पर्यवेक्षक दिलीप मोरगे यांनी अरविंद तोडकरी आणि कुटुंबीयांचे गुलाबपुष्प देवून स्वागत केले . प्रशालेच्या कला विभागातर्फे गेली २२ वर्षे राबविण्यात येत असलेल्या ” कलासाधना ” या चित्रकला वार्षिक उपक्रमाचे तोडकरी यांनी भरभरून कौतूक केले . एखादे काम कौतुकास पात्र ठरण्यासाठी त्यामागे खूप मोठी पार्श्वभूमी असते . पैसा फंड कलादालन उभे रहाण्यामागे अविरत मेहनत हाच खऱ्या कौतुकाचा भाग आहे असे तोडकरी यांनी स्पष्ट केले. व्यापारी पैसा फंड संस्थेचे सचिव धनंजय शेट्ये यांची आणि आपली भेट झाली त्यावेळी आपण पैसा फंड संस्थेच्या कलादालना विषयी खूप ऐकले आहे, आपल्याला कलादालन पहायचे आहे, असे मत व्यक्त केले आणि रविवार असूनही कला विभागातर्फे आम्हाला कलादालनाबाबत सर्व माहिती देण्यात आली याचे आम्हाला खूप कौतूक वाटले असे तोडकरी यांनी नमूद केले.
अरविंद तोडकरी गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण काम करत आहेत. खेडचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेय. शिव चैतन्य नागरी पतपेढीचे संस्थापक अध्यक्ष तसेच सहजीवन शिक्षण संस्थेचे सदस्य म्हणून काम पहाणाऱ्या अरविंद तोडकरी यांचे आम्हाला बहुमोल मार्गदर्शन मिळेल असे मत व्यापारी शिक्षण संस्था संगमेश्वरचे सचिव धनंजय शेट्ये यांनी व्यक्त केले. यावेळी अरविंद तोडकरी यांच्या समवेत त्यांची पत्नी, आप्तेष्ट उपस्थित होत्या. पैसा फंड कलादालनाला नुकताच राजा रवि वर्मा पुरस्कार मिळाल्याबद्दल अरविंद तोडकरी यांनी संस्था आणि प्रशालेचे अभिनंदन केले. आमच्या संस्थेच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांना पैसा फंडचे कलादालन पहायला खेड येथून मुद्दामहून पाठवणार असल्याचे अरविंद तोडकरी यांनी यावेळी सांगितले.