(कोल्हापूर)
मे महिन्यात उन्हाळी सत्रातील परीक्षेदरम्यान घडलेल्या पेपरफुटी प्रकरणाची शिवाजी विद्यापीठाने गंभीर दाखल घेऊन कोल्हापूरच्या शहाजी महाविद्यालयातील ४ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. परीक्षा प्रमाद समितीचा अहवाल व विद्यापीठाच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे यांनी व्यवस्थापन मंडळाशी चर्चा करुन चार कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याच्या निर्णय घेतला.
शिवाजी विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षेदरम्यान ३० मी रोजी बीकॉमचा ऍडव्हान्स अकॉउंटन्सीचा पेपर फुटला होता. या पेपरफुटीमुळे कोल्हापुरात मोठी खळबळ माजली होती. शिवाजी विद्यापीठाने या प्रकरणी चौकशी समिती नेमली. या समितीने अडीच महिन्यांनी आपला चौकशी अहवाल शिवाजी विद्यापीठाला सादर केला. त्यानंतर या पेपरफुटीप्रकरणी विद्यापीठाने कोल्हापूरच्या शहाजी महाविद्यालयातील अधीक्षक रवी भोसले, कारकून सिद्धेश मिस्त्री, गणेश पाटील आणि विशाल पाडळकर यांना बडतर्फ केले आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षेदरम्यान बीकॉमचा अॅडव्हान्स अकाउंटन्सी पेपर फुटी प्रकरण गाजले होते. ३१ मे २०२३ रोजी परीक्षा सुरू होण्याअगोदर पेपर फोडण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार काही वेळातच लक्षात आला. विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ हालचाली करुन संबंधित प्रश्नपत्रिकेऐवजी दुसऱ्या प्रश्नपत्रिकेच्या आधारे परीक्षा घेतली. नियोजत वेळेत परीक्षा सुरू करण्यास विलंब झाल्याने विद्यार्थ्यांना जादा वेळ दिला. शिवाजी विद्यापीठाने या साऱ्या प्रकरणाची गंभीर दखल घेत परीक्षा प्रमाद समितीमार्फत चौकशी केली होती. अडीच महिन्याच्या आत या प्रकरणाचा छडा लावत कारवाईचा बडगा उगारला आहे. त्या पेपर फुटी प्रकरणी कोल्हापुरातील शहाजी कॉलेजमधील चार कर्मचाऱ्यांना कठोर कारवाई करण्याच्या सूचना सोमवारी (सात ऑगस्ट) परीक्षा प्रमाद समितीने केली होती. पेपरफुटी प्रकरणी शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात इतकी मोठी कारवाई झाल्याची ही पहिलीच घटना आहे. एकाचवेळी चार कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली आहे. सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. या सगळया प्रकाराची शहानिशा करुन कार्यवाहीवर शिक्कामोर्तब झाले.
पेपर फुटी प्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर नियमानुसार कारवाई होईल अशी स्पष्ट भूमिका संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे यांनी पहिल्या दिवसापासून घेतली. त्यानुसार संस्थेने या प्रकारची चौकशी करत चौघांना निलंबित केले होते. दुसरीकडे विद्यापीठाच्या परीक्षा प्रमाद समितीकडे हे प्रकरण पोहचले. गेले दोन महिने या प्रकरणी चौकशी, म्हणणे ऐकून घेणे, कायदेशीर बाबी तपासणे या प्रक्रिया सुरू होत्या. परीक्षेच्या कामकाजाला गालबोट लागू नये यासाठी सखोल चौकशी करुन कारवाईचा निर्णय झाला. परीक्षा प्रमाद समितीने संबंधित चार कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यासंबंधीची कार्यवाही करावी, अशी सूचना शहाजी कॉलेजला सात ऑगस्टला केली. यासंबंधी शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी कारवाईचे अधिकार संस्था व कॉलेज अखत्यारित असतात, व पेपरफुटी प्रकरणी परीक्षा प्रमाद समितीचा अहवाल संबंधित कॉलेजला कळविले असल्याचे सांगितले.