(मुंबई)
प्रसिद्ध ऑनलाइन फर्नीचर कंपनी पेपरफ्रायचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अंबरीश मूर्ती यांचे काल निधन झाले. अंबरीश मूर्ती यांनी वयाच्या ५१ व्या वर्षी लेहमध्ये अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. अंबरीश मूर्ती यांच्या निधनाची माहिती पेपरफ्राय ऑनलाइन फर्निटर स्टोअरचे दुसरे सह-संस्थापक आशिष शहा यांनी ट्वीट करून दिली आहे.
१९९०च्या दशकात अंबरीश मूर्ती यांनी दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून इंजिनीअरिंगची पदवी घेतली. यानंतर १९९६ मध्ये आयआयएम कोलकाता येथून एम. बी. एचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर अंबरीश मूर्ती यांनी कॅडबरी कंपनीमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून काम केले. कंपनीने त्यांना एरिया सेल्स मॅनेजर केल्यानंतर ते केरळला गेले होते. अंबरीश मूर्तींनी ५ वर्षानंतर कंपनी सोडली. त्यानंतर अंबरीश मूर्तीने २ वर्षांसाठी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एम. एम. सीमध्ये म्युच्यअल फंड प्रोडक्ट लाँच कसे करायचे हे शिकले. २००५ मध्ये त्यांनी ब्रिटानियामध्ये मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम केले. यानंतर अंबरीश मूर्तींनी २०१२ मध्ये आशिष शहा यांच्यासोबत पेपरफ्राय या फर्निचर आणि होम डेकोरच्या ई-कॉमर्स कंपनीची स्थापना केली. या कंपनीने वर्षभरात फर्निचर आणि होम डेकोर व्यवसायात मोठे यश मिळवले.