(बुलढाणा)
बारावीच्या पेपर फुटीप्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन माहिती समोर येत आहे. आतापर्यंतच्या तपासावरून एका मोठ्या रॅकेट अंतर्गत गणिताचा पेपर फोडण्यात आल्याचे समोर आले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा पोलिस ठाणे हद्दीतील राजेगाव येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय व भास्करराव शिंगणे कला महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रात पेपर सुरू होण्याआधी अर्धा तास अगोदर गणिताच्या पेपरची दोन पाने व्हॉटसअपवर व्हायरल झाली. तसेच राजेगावप्रमाणेच मुंबईतील एका परीक्षा केंद्रावरही पेपर एका व्हाटसअॅपग्रूपवर व्हायरल झाला होता. दरम्यान, एका विद्यार्थ्यांकडून १० ते १२ हजार रुपये घेऊन हा पेपर फोडण्यात आल्याचा संशय आहे.
साखरखेर्डा पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात, या पेपरफुटी प्रकरणात ५ जणांना अटक करण्यात आली. यामध्ये २ शिक्षकांनादेखील ताब्यात घेण्यात आलेले आहे. हे सर्वजण शेंदूरजन, बिबी, किनगावजट्टू, व भंडारी या गावातील आहेत. राजेगाव येथील पेपरफुटी प्रकरणाचे राज्यस्तरीय धागेदोरे उघडकीस येण्याची शक्यता असून, हे एक मोठे रॅकेट असल्याचा संशय पोलिसांना आहे. मुंबईतील दादर येथील डॉ. ऍण्टोनिओ डिसिल्वा हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमधील एका विद्यार्थ्याच्या मोबाईलमधून या पेपरचा काही भाग मुंबई पोलिसांनी जप्त केला.
मुंबई पोलिसांनी गुन्हे शाखेकडे सोपविले आहे. या पेपरफुटीचे धागेदोरे राजेगाव पेपरफुटी प्रकरणाशी असल्याचा संशय पोलिसांना आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १० ते १२ हजार रुपये घेऊन पेपर फोडण्यात आल्याचा प्राथमिक संशय असून, याबाबत मुंबई गुन्हे शाखा व डीवायएसपी यामावार यांच्या नेतृत्वात साखरखेर्डा पोलिस कसून तपास करत आहेत. काही महत्वपूर्ण पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
पेपरफुटीच्या कनेक्शनचा तपास
मुंबईतील दादरमध्ये गणिताचा पेपर सुरू होण्याआधी १० वाजून १७ मिनिटांनी एका व्हॉटसअप ग्रूपवर या पेपरची दोन पाने व्हायरल झाली होती. बरोबर त्याच वेळेस राजेगाव (ता. सिंदखेडराजा) येथील काही विद्यार्थ्यांना हा पेपर मिळाला होता. त्यामुळे या पेपरफुटीच्या कनेक्शनचाही तपास पोलिस करत आहेत. तसेच, राज्यभरात आणखी कुठे कुठे अशाच पद्धतीने पेपर फुटला? याचाही तपास मुंबई पोलिस करत आहेत.
व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये ९० जणांचा समावेश
पेपरफुटीसाठी ज्या व्हॉटसअॅप ग्रूपचा वापर करण्यात आला, त्यात एकूण ९० जणांचा समावेश होता. त्यात काही शिक्षक, विद्यार्थी आणि इतरही काही व्यक्ती होते. प्रसारमाध्यमांनी पेपरफुटीची बातमी प्रसारित करताच हा व्हॉटसअप ग्रूप डीलिट करण्यात आला. तरीदेखील मुंबई पोलिसांनी हा डीलिट केलेला ग्रूप शोधून काढला असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे अनेकजण लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकू शकतात.