सध्या प्रत्येकाच्याच मोबाईलवर “पेनानं लिहिलेल्या नोटा चलनातून बाद होणार, बँकेतही अशा नोटा चालणार नाहीत” असा मेसेज व्हायरल होत आहे. यामध्ये असा दावा करण्यात येतोय, नव्या नियमानुसार पेनानं लिहिलेली नोट, तसंच फाटलेली नोट आपोआप चलनातून बाद होते. हा दावा मेसेजमध्ये केल्याने बँकेत चौकशी करण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे.
तुमच्याकडे असलेल्या नोटांवर पेनानं लिहिलं असेल तर ती चालणार नाही. त्या नोटेची किंमत शून्य असेल. मग ती नोट 100 रुपयांची असो, नाहीतर 2 हजार रुपयांची. त्या नोटेला काडीचीही किंमत नाही. असे दावा करणारे मेसेज सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. आरबीआयच्या नव्या नियमांनुसार, 50, 100, 200, 500, 2000 रुपयांच्या नोटांवर काही लिहिलेलं असेल तर त्या चलनातून बाद असतील. त्या नोटा चालणार नाहीत, असे त्या मेसेजमध्ये म्हटले गेले आहे.
हा मेसेज व्हायरल होत असल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. पैसे हा प्रत्येकासाठी महत्त्वाचा विषय आहे व प्रत्येकाकडे एखादी तरी अशी नोट मिळतेच. तर अनेकदा आपल्याकडेही फाटलेल्या, लिहिलेल्या नोटा येत असतात. तर अशा नोटा आता जाणूनबुजून एकाकडून दुस-याकडे, दुस-याकडून तिस-याकडे फिरत होत्या. अनेकजण वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून अशा नोटा संपवण्याचा प्रयत्न करीत होते. खेडोपाड्यातील अनेक लोक अशा मेसेजमुळे हवालदिल झाली होती.
याबाबत सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता तसेच बँकेतून मिळविलेल्या माहितीनुसार असा व्हायरल होत असलेला मेसेज खोटा असल्याचे निष्पन्न झाले आहे. पेनानं लिहिलेल्या नोटा चलनातून बाद होत नाहीत. मात्र स्वच्छ नोट पॉलिसीच्या धोरणांनुसार नोटांवर काही लिहू नये, असे सरकारचे धोरण आहे. पेनानं लिहिल्याने नोटांचं आयुष्य कमी होतं व त्या कोण स्वीकारायला तयार होत नाहीत, अनेक दुकानदारही अशा नोटा घेत नाहीत. त्यामुळे त्यावर लिखाण करणे टाळावे, असे सरकारचे म्हणणे आहे. मात्र खराब, फाटलेल्या नोटा बँकेत बदलून मिळतात, असं असलं तरी नोटांवर काही लिहू नका एवढ मात्र नक्की!