(रत्नागिरी)
रत्नागिरीतील एका खुनाच्या गुन्ह्यात कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेला कैदी संचित (पॅरोल) रजेवर बाहेर आला होता. आपली रजेची मुदत संपल्यावरही कारागृहात हजर राहिला नसल्याने या कैद्याविरोधात रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. मुईन मोहम्मद युसुफ काझी ऊर्फ मोईन उर्फ रॉनी ब्रिगेन्झा ऊर्फ हेमंत शहा (रा. आशियाना मंजिल, आशीर्वाद सोसायटी, उत्कर्षनगर, कुवारबाव, रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे.
या संशयित आरोपीवर ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्याला या गुन्ह्यात न्यायालयाने २०१५ ला जन्मठेप आणि १२ हजार दंड, तो न भरल्यास १४ महिने करावासाची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा भोगण्यासाठी त्याची रवानगी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. दरम्यान, पश्चिम विभाग येरवडा, पुणेचे कारागृह उपमहानिरीक्षकांच्या आदेशानुसार या आरोपीला ८ जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ या २८ दिवसांच्या संचित रजेवर सोडण्यात आले होते; परंतु रजेचा कालावधी संपल्यावर तो ५ ऑगस्टला कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात हजर होणे अपेक्षित होते; परंतु तो हजर झालेला नाही. त्यामुळे अनधिकृतपणे कारागृहाबाहेर वास्तव्य करत असल्यामुळे त्याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.