(लिमा)
दक्षिण अमेरिका खंडाच्या पेरू देशांमधून शास्त्रज्ञांना एका प्राण्याचे जीवाश्म सापडले आहेत. जे पृथ्वीवरील सर्वात मोठा वजनदार प्राणी असण्याची शक्यता आहे. त्यांना एका प्राचीन व्हेलचे जीवाश्म सापडले आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, सर्वात मोठ्या ब्लू व्हेलचे जीवाश्म देखील त्याच्याशी बरोबरी करू शकत नाहीत. शास्त्रज्ञांनी जीवाश्माच्या कार्बन डेटिंगवरून अंदाज लावला आहे की, ते सुमारे ३९ दशलक्ष वर्षे जुने आहेत.
पेरूच्या दक्षिणेकडील वाळवंटातून व्हेलचे हे जीवाश्म (हाडे) उत्खनन करण्यात आले आहेत. त्याचे नाव पेरुसिटस कोलोसस असे दिले गेले आहे. शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की, जेव्हा ही व्हेल जिवंत असती तेव्हा तिचे वजन सुमारे २०० टन म्हणजे दोन लाख किलोग्रॅम असते. हे जीवाश्म सुमारे १३ वर्षांपूर्वी सापडले होते. त्याच्या आकारामुळे पेरूची राजधानी लिमा येथे आणण्यासाठी तीन वर्षे लागली, जिथे त्याचे संशोधन केले जाणार होते. समुद्रात राहणाऱ्या या व्हेलच्या शरीरातील सुमारे १८ हाडे वाळवंटातून काढण्यात आली.
ब्रुसेल्समधील रॉयल बेल्जियन इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरल सायन्सेसच्या डॉ. रेबेका बेनिअन यांनी सांगितले की, मणक्याचा प्रत्येक तुकडा सुमारे १०० किलो आहे, जो थक्क करणारा आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, पेरुसिटस कोलोससची लांबी १७ ते २० मीटर असण्याची शक्यता आहे जी सामान्य व्हेलपेक्षा कमी आहे. परंतु वजनाच्या बाबतीत, त्याच्या हाडांचे वजन ५.३ ते ७.६ टन असेल, शरीराचे स्नायू आणि इतर अवयव जोडले गेल्यानंतर त्याचे एकूण वजन किमान ८५ टन ते कमाल ३२० टन इतके होईल.