(भांडुप/किशोर गावडे)
भांडुपच्या प्रताप नगर जंक्शनजवळील 900 मि.मी जीआरपी जलवाहिनी फुटल्यानंतर जलवाहिनी दुरुस्तीकडे पालिकेने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने ट्राफिकचा सगळा सावळा गोंधळ उडाला आहे. नवतरंग जनरल स्टोअर्स, मुंबईकर फरसाण शॉप समोर, ॲक्सिस बँक जवळ, फुगावाला कंपाऊंड, क्वारी रोड, येथे 19 रोजी ही घटना घडली आहे. प्रताप नगर रोड, हनुमान नगर, माता रमाबाई नगर, फरीद नगर, महाराष्ट्र नगर, उत्कर्ष नगर, क्वॉरी रोड, काजू टेकडी, एकता पोलिस चौकी, बुद्ध नगर, एल बी एस लगतचा मंगतराम पेट्रोल पंपापासुंन विक्रोळी पर्यंत,कांजूरमार्ग ( प) स्टेशन लगतचा परिसर, नेवल कॉलनी, डॉकयार्ड कॉलनी,सूर्य नगर, चंदन नगर, सन सिटी, गांधी नगर, विक्रोळी (प), एल बी एस लगतच्या इंडस्ट्रिअल वसाहत, संतोषी माता नगर, टागोर नगर ग्रुप नंबर ५ – विक्रोळी पूर्व येथील नागरिकांना पाणीपुरवठा नसल्याने विभागात असंतोष निर्माण झाला आहे.
मात्र, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे तात्काळ पत्रक काढून नागरीकांना कळवले नाही. ही जबाबदारी प्रशासनाची होती. यामुळे दुपारपासून वहातूक कोंडीला सामोरे जावे लागले. घटनास्थळी एस विभागातील जलखात्याचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता. कॉन्ट्रॅक्टर देखील गायब होता. भर रस्त्यावर जेसीबी टाकून ड्रायव्हर गायब झाला होता. फुगावाला कंपाऊंड ते मंगतराम पेट्रोल पंपापर्यंत वहानांची एकच गर्दी वाढली होती. रुग्णांला रुग्णालयात नेण्यासाठी विजय क्रीडा मंडळाच्या रुग्णवाहिकेला मार्गस्थ होण्यासाठी रस्ता मोकळा करताना चालकाला उतरावे लागले होते.
फुगावाला कंपाऊंडच्या दुकानदारांच्या दारात चिखल व दलदल झाली असून एकेरी वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने वाहतूकीची कोंडी रोखण्यासाठी प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे दुकानदार व नागरिकांमध्ये वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. महापालिकेच्यावतीने दुय्यम अभियंता कनिष्ठ अभियंता दुरुस्तीचे काम सुरू असताना साइटवर दिसून आलेले नाहीत. मनपा एस विभागाचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी हे पितृपक्षात कार्यालयातच येत नाहीत असे पालिकेकडून सांगण्यात आले.
तोच रस्ता, तीच जागा, तोच परिसर, तोच नाका, त्याच दुकानदारांसमोर मातीचे ढिगारे पाहून व्यावसायिक संतप्त झाले आहेत. गेल्या आठवड्यात हि जलवाहिनी फुटली. तो राडारोडा काढताना आठवडा झाला आणि पुन्हा आज जलवाहिनी फुटल्याने व्यावसायिकांचा संतप्त रुद्रावतार पाहायला मिळाला.
दुरुस्तीचे काम सुरू असताना वाहतूक पोलिसांनी व्यवस्था करण्यात यावी. पालिकेचे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहणे गरजेचे आहे. दुरुस्तीच्या कामासाठी पालिकेने जास्तीत जास्त कर्मचारी लावून काम वेळेत पूर्ण करावे, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. 900 मी मी. व्यासाची जलवाहिनी (दि.10 सप्टेंबर) रोजी अचानक फुटली होती. काल पुन्हा 19 रोजी पालिकेचे करोडो लिटर पाणी वाया गेले आहे याला जबाबदार कोण? हा प्रश्न निर्माण झालेला आहे.