रत्नागिरी : राजापूर, चिपळूण, खेड आणि अन्य ठिकाणी गेल्या आठ दहा दिवसातील अतिवृष्टीमध्ये अनेक व्यापारी, दुकानदार, छोटेमोठे उद्योजक, शेतकरी यांचे अतोनात नुकसान झाले आहे. चिपळूण शहरामध्ये तर व्यापार्यांना पुराने धुवून नेले आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांना शून्यातून उभे करण्याकरिता रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी ही अल्प दरात कर्ज पुरवठा करणार असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, संकटकाळी रत्नागिरी जिल्ह्याची बँक या सर्व पुरग्र्रस्त लोकांना त्यांचे गतवैभव परत प्राप्त करून देण्याकरिता जी पैशाची गरज लागणार आहे ती अल्पदराने कर्ज देवून ती गरज भागविण्यास जिल्हा बँक तयार आहे. हे कर्ज परतफेड करताना कर्जदारांना एक वर्षाचा अधिस्थगत (मॉरीटोरियम) मुदत देणार आहे.
एक वर्ष त्यांना कर्जाचा हप्ता फेडायचा नाही. व्याज फक्त भरायचे आहे. त्यासाठी लवकरच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक चिपळूण, खेड व इतर ठिकाणी गरजेप्रमाणे एक वेगळा पुरग्रस्त कर्ज मंजूरी कक्ष निर्माण करणार आहे. त्यामध्ये त्यांच्या माध्यमातून पुरग्रस्तांना, व्यापार्यांना, उद्योजकांना, दुकानदार, शेतकर्यांना, पुरात वाहून गेलेल्या वाहनधारक अशांना वित्त पुरवठा करण्यास सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.
शासनाने त्यासाठी पुढे येवून काही टक्के इंटरेस्ट सबसीडी व्याज अनुदान दिले पाहिजे व त्यासाठी तसा जीआर तात्काळ काढला तर अत्यंत अल्प दराने कर्ज पुरवठा होईल असे डॉ. तानाजीराव चोरगे म्हणाले.
याबाबत मा. मंत्री महोदय उदय सामंत, खासदार विनायक राऊत व आमदार शेखर निकम यांच्याशी चर्चा केली आहे. चर्चेमध्ये मा. मंत्री महोदय उदय सामंत, खा. विनायक राऊत व आमदार शेखर निकम यांनी मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री यांचेशी फोनवर चर्चाही केली व व्याजाबद्दल निर्णय घेवू असे त्यांनी सांगितले. व तसा निर्णय होण्याची शक्यता आहे.