( दापोली )
पुस्तकांची सोबत हा सर्वोत्तम आनंद असतो. आपण वाचलेल्या पुस्तकांचा आनंद दुसऱ्यांना मिळावा, तसेच वाचन संस्कृती जतन होण्यासाठी पुस्तकांची देवाण-घेवाण व्हावी म्हणून १४ फेब्रुवारी हा जागतिक पुस्तक आदानप्रदान दिवस म्हणूनही साजरा केला जातो. पुस्तकांच्या देवाणघेवाणीबरोबरच विचारांची देवाण घेवाण होत असते. यानिमित्ताने पुस्तक घ्यावे, पुस्तक द्यावे, अखंड वाचीत जावे या जनजागृतीसाठी दापोली सायकलिंग क्लब तर्फे रविवारी, १३ फेब्रुवारी २०२२ रोजी सायकल फेरी काढण्यात आली.
आझाद मैदान दापोली येथून सुरु झालेली सायकल फेरी नॅशनल हायस्कूल, काळकाई कोंड आमराई, कलाम गल्ली, नागरबुडी, भारतनगर, नशेमन कॉलनी, जोगेळे शाळा, काळकाई देवी मंदिर, आझाद मैदान अशा ६ किमीच्या मार्गावर झाली. यामध्ये मुलांसोबत सर्व वयोगटातील नागरिक सहभागी झाले होते. ठिकठिकाणी सायकल फेरीचे खाऊ, चिक्की, पाणी, सरबत देऊन स्वागत करण्यात आले. काळकाई कोंड येथे नगरसेविका प्रिती सतीश शिर्के, बाबूशेठ शिर्के आणि ग्रामस्थ यांनी खाऊ वाटून स्वागत केले. शेख उस्मान कॉलनी, नशेमन कॉलनी येथेही दाउद इब्राहिम परकार, शाहबुद्दिन चिपळूणकर, शाहबाझ देशमुख, अब्दुलाझिझ दादरकर, सूरवत शरीफ परकार, हुसैन कुरये, निसार चिकटे, सईद देशमुख व ग्रामस्थ यांच्यातर्फे पाहुणचार झाला. मशिद दाखवण्यात आली. ग्रामस्थांनी सायकल फेरीला शुभेच्छा दिल्या आणि प्रत्यक्ष सहभाग घेऊन सायकल पण चालवली.
सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने सर्वांसाठी दापोली सायकलिंग क्लबमार्फत विनामूल्यपणे सायकलविषयक उपक्रम, सायकल राईड, स्पर्धा, शर्यती, सायकल फेरी इत्यादींचे आयोजन केले जाते. या सायकल फेरीचे नियोजन करण्यात संदीप भाटकर, उत्तम पाटील, सुनिल रिसबूड, केतन पालवणकर, मृणाल खानविलकर, झाहीद दादरकर, प्रशांत पालवणकर इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली. दैनंदिन जीवनात सायकलचा वापर अधिक करा आणि इतरांनाही प्रेरित करा असे आवाहनही आयोजकांनी केले आहे.