(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
रत्नागिरी शहरातील आरोग्य मंदिर येथील 22 वर्षीय विवाहित महिलेला ऑनलाईन 36 हजार रूपयांचा गंडा घातल्याची फिर्याद रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे. याबाबतची फिर्याद अमरीन दानिश शेखदारे (22, आरोग्यमंदिर, रत्नागिरी) यांनी दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेखदारे यांनी आपले शोकेस कपाट विकायचे आहे असे सोशल मिडियावर टाकले होते. त्यांच्या मोबाईलवर सोनू शर्मा याने कॉल करुन तुमचे शोकेस कपाट घेण्यास मी तयार आहे असे म्हणत 10 हजारला घेतो असे सांगितले. त्याने आपल्या अकाउंटवरून 1 रुपया शेखदारे यांच्या अकाउंटवर टाकला. त्यानंतर त्याने आपला क्युआर कोड पाठवला. त्यावर तो स्कॅन करायला सांगून त्यांच्या खात्यातून 36 हजार रुपये ऑनलाईन लंपास केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेखदारे यांनी शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञाताविरोधात भादविकलम 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.