(पुणे)
बनावट जॉब रॅकेट चालवल्याप्रकरणी चार आफ्रिकन नागरिकांना पुण्यात अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे दोन लाख ई-मेल आयडी आणि एक लाखाहून अधिक मोबाईल फोन नंबर असल्याची माहिती आहे. या सगळ्या मोबाईल नंबर आणि मेलचा वापर नागरिकांना फसवणूक करण्यासाठी हे चार नागरिक करत होते. या रॅकेटमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
चार आरोपी झांबिया, युगांडा, नामिबिया आणि घानाचे नागरिक आहेत. अमेरिकेत नोकरी देण्याच्या बहाण्याने एप्रिल ते जुलै दरम्यान २६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा दावा मुंबईतील एका व्यक्तीने बीकेसी येथील सायबर सेलकडे केला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. पोलिसांनी ४ आरोपींना पुण्यातून अटक केली. आरोपीचे वय २२ ते ३२ वर्षांदरम्यान आहे. अमेरिकेत नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक केली आहे.
आरोपींकडे दोन लाख ई-मेल आयडी, १,०४,००० लोकांचे मोबाईल फोन नंबर्सचा डेटाबेस असून त्याचा वापर करुन ते लोकांची फसवणूक करत असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी १३ मोबाईल फोन, चार लॅपटॉप, विविध देशांचे पासपोर्ट, तीन इंटरनेट राउटर, विविध बँकांचे १७ चेकबुक, ११५ सिमकार्ड, ४० बनावट रबर स्टॅम्प आणि किमान सहा बँकांचे खाते तपशील जप्त केले. भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ४२० आणि १२०-बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.