(पुणे)
देवदर्शनासाठी पुण्यात आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला चढवला. एका कुटुंबातील तब्बल दहा सदस्यांवर मधमाशांनी हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या घटनेत एकाच कुटुंबातील १० सदस्यांची प्रकृती गंभीर बनली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रेशमा भदिर्गे, मालन थोपटे, सुरेखा थोपटे, संस्कार भदिर्गे, कादंबरी भदिर्गे, राहुल पवार, नारायण भदिर्गे, सयाजी भदिर्गे, नंदा भदिर्गे व सुरेश चोरघे (सर्व खामगाव मावळ) असे मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांची नावे आहेत. हे सर्व नातेवाईक असून एकाच गाडीने देवदर्शनासाठी जात होते. गुरुवारी दुपारच्या सुमारास सांबरेवाडी येथील भवानी आई माता देवीच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी अचानक त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला चढवला.
खामगाव मावळ येथील कुटुंब भवानी आई माता देवीच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी मधमाशांनी कुटुंबातील सदस्यांवर हल्ला केला. मधमाशांच्या हल्ल्याची तीव्रता एवढी भयानक होती की, सर्व सदस्य अत्यवस्थ होऊन बेशुद्ध पडले होते. मधमाशांनी कुटूंबावर हल्ला केल्याची माहिती मिळताच गावातील नागरिक मदतीसाठी धावले. त्या सर्वांना सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.