(पुणे)
आज सकाळी पहाटे ४ वाजता पुण्याच्या भवानी पेठेतील टिंबर मार्केटमध्ये एका लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागली. ही आग भीषण असून आगीचे आणि धुराचे लोट दूरवरुन दिसत होते. अग्निशामक दलाचे तब्बल १८ बंब घटनास्थळी पोहचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.
पुण्यात भवानी पेठ येथील टिंबर मार्केट प्रसिद्ध आहे. या ठिकाणी लाकडाच्या वस्तु व इतर सामान मिळते. रोज या ठिकाणी मोठी उलाढाल होत असते. या ठिकाणी अनेक गोदामे असून या ठिकाणी अनेक व्यापाऱ्यांनी आपला लाकडाचा माल साठवून ठेवला आहे. दरम्यान, आज पहाटे येथील रामोशी गेटनजीक लाकूड सामान असलेल्या एका गोडाऊनला भीषण आग लागल्याची माहिती पुणे अग्निशामक दलाला मिळाली. ही आग एवढी भीषण आहे की यात लाखोंच्या लाकडाचे जळून नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच पुणे-पुणे कॅन्टोमेंट-पीएमआरडीए आणि पालिकेच्या अग्निशमन दलाची एकुण १८ अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. आग एवढी भीषण असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पथकाला अडचणी येत असल्याची माहिती पुणे अग्निशामक दलाने दिली.