(पुणे)
पुणे पोलिसांनी महत्त्वाची कामगिरी केली आहे. राजस्थान येथून फरार झालेल्या दोन दहशतवाद्यांना कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. तिसरा दहशतवादी फरार झाला आहे. या तिन्ही दहशतवाद्यांवर NIA ने तब्बल ५ लाखांचे बक्षीस ठेवले होते. तब्बल दोन वर्षापासून हे दहशतवादी फरार होते.
मोहमद ईनुस साखी व इम्रान खान अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पुणे पोलिसांच्या या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी या बाबत माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी कोथरूड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक कुलकर्णी, पोलीस अंमलदार प्रदीप चव्हाण आणि अमोल नजन गस्तीवर होते. यावेळी त्यांना दुचाकीवर तिघे जण संशयीतरित्या फिरतांना दिसले. संबंधित तीनही संशयित आरोपी हे पुण्यातील कोंडवा परिसरात वास्तव्यास आहेत. पण ते कोथरुडमध्ये सारखे ये-जा करायचे. कोथरुड येथून ते काहीतरी संशयास्पद काम करत असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यातून एटीएस आणि कोथरुड पोलीस यांनी संयुक्त विद्यमाने संबंधित ठिकाणी धाड टाकली.
ते एका ठिकाणी थांबले असता पोलिसांनी त्यांना हटकले. मात्र, त्यांची हालचाल संशयास्पद दिसल्याने त्यांना पोलिसांनी बोलावून घेतले. दरम्यान, यावेळी एक जण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला. पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ कुऱ्हाड आढळली. तसेच दुचाकी देखील चोरीची असल्याचे तपासात आढळले.
दरम्यान, काल दिवसभर केलेल्या तपासात हे दोघे दहशतवादी असल्याचे निष्पन्न झाले. हे दशतवादी राजस्थान येथून फरार झाले होते. NIAने त्यांच्यावर पाच लाख रुपयांचे इनाम ठेवले होते. त्यांच्या शोधत अनेक तपास यंत्रणा होत्या. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केलेला मोबाईल, लॅपटॉप यांची तपासणी सुरू केली आहे. तर इतर तपास यंत्रणा देखील पुण्यात दाखल झाल्या आहेत. राजस्थान चितोडगड याठिकाणी एनआयएने कारवाई केली होती. तेव्हा काही स्फोटक पकडले गेले होते. त्या गुन्ह्यात हे आरोपी फरार होते.