सुंदर शिल्पे, कोरीव काम, रेखीव नक्षी व मूर्ती काम असलेल्या पुणेतीलसोमवार पेठ मंदिरात त्रिशुंड गणपती विराजमान आहेत. चौकोनी बैठकीवर तीन सोंडी असलेला व मोरावर बसलेला असा हा मयुरेश आहे. उजवी सोंड उजव्या खालच्या हातातील मोदकपात्राला स्पर्श करीत आहे. डाव्या सोंडेने डाव्या मांडीवर बसलेला शक्तीच्या हनुवटीला स्पर्श करीत आहे. या गणपतीला सहा हात असून वरील हातात अंकुश व परशू, मधल्या हातात शूल, डाव्या हातात पाश, खालच्या उजव्या हातात मोदकपात्र आणि डाव्या हाताने शक्तीला आलिंगन दिले आहे. त्याच्या मांडीवर शारदादेवी (शक्तिदेवता) बसलेली असून दोन्ही बाजूस रिद्धी व सिद्धी आहेत.
मंदिराच्या जवळपास प्रत्येक दगडावर कोरीव काम असून काही शिलालेखही आढळून येतात. संस्कृत शिलालेखांमध्ये ”पुण्यनगरी पुरी” असा उल्लेख असून गणपती, सरस्वती, दक्षिणामूर्ती तसेच दत्तात्रयाला नमन केले आहे. रामेश्वर, सप्तशतीचाही उल्लेख आहे, तर फार्सी लेखांमध्ये गुरूदेव दत्ताचा उल्लेख आहे.
गोसावी पंथीयांची सर्वसाधारणपणे शिवमंदिरे असतात; पण गणपती, विष्णू यांचीही मंदिरे या लोकांनी बांधली आहेत. त्यापैकीच त्रिशुंड गणपती मंदिर असून, मंगळवार पेठेतील कमला नेहरू हॉस्पिटलजवळच सोमवार पेठेतील पुरातन नागेश्वर मंदिराच्या अलीकडे नागझरीलगत हे गणेश मंदिर आहे.
इंदूरजवळील घामपूर गावचे भीमगीरजी गोसावी यांनी 1754 च्या सुमारास हे मंदिर बांधले आहे. संपूर्ण देवळावर शिल्पे, कोरीव काम, नक्षी व मूर्ती कोरलेल्या असून, देवाचे अवतार, माकडे, द्वारपाल यांनी मुख्य भिंती पूर्ण व्यापलेल्या आहेत. मंदिरात तीन सोंड असलेली त्रिशुंड गणपतीची मूर्ती मोरावर बसलेली अशी आहे.
या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ प्रमुख भिंतीवर दर्शनी भागात एक कालसूचक शिल्प आहे. बंदूकधारी इंग्रज शिपायाने एका गेंड्याला साखळदंडाने बांधून टाकले आहे. इंग्रजांचा बंगालमधील पाया व प्रसार तसेच मध्यवर्ती मोगली सत्तेस बंगालमध्ये लागलेले ग्रहण, याचे चित्रण, गेंडा हा बंगाल व आसामचे प्रतीक याद्वारे दाखवले आहे असे मानले जाते. हे सत्य असल्यास मंदिर निर्माण करणाऱ्यांच्या दूरदृष्टीने कौतुक करावे लागेल. द्वारपाल, व्यालमुख, मोर व पोपट यांनी सुशोभित कमानी, गजयुद्धे, ब्रॅकेटसाठी आधारभूत भैरव, मंगलकलश, गजलक्ष्मी दशावतार शेषशाही विष्णू अशा अनेक मूर्ती सर्व भिंतीवर कोरलेल्या आहेत.
या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिरास दगडी बांधकामातच तळघर आहे. उपासना, ध्यानधारणा किंवा पाठशाळा असा वापर या तळघराचा त्या काळी होत असावा. भव्य चौथऱ्यावर या दगडी मंदिराची उभारणी केलेली असून, अतिशय आकर्षक असे शिल्प सौंदर्याने नटलेली हे मंदिर वास्तूकला-परंपराची साक्ष देणारा एक उत्तम वारसा आहे.
या मंदिराला पारंपरिक शिखर नसून, शिखराच्या जागी गोलाकार बांधकाम आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात जिथून प्रवेश होतो, त्या गर्भप्रवेशद्वारावर उजव्या सोंडेच्या गणेशाची मूर्ती आहे व खालील बाजूस गणेशचक्र आहे. या गणेशपट्टीच्या वर गजलक्ष्मी कोरलेली असून, वरील बाजूस चांगल्या स्थितीतील एकूण तीन शिलालेख गर्भप्रवेशद्वारावर आहेत. त्या पैकी दोन संस्कृतमध्ये असून एक फारसीत आहे. देवळाच्या बाहेरच्या बाजूने दक्षिणेकडे नटराज व उत्तरेकडे विष्णू भैरव कोरलेला आहे, तर पश्चिमेकडे मागील बाजूस वैशिष्ट्यपूर्ण शिवलिंग आहे.
मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरले की सभामंडपात प्रवेश होतो. येथील सभामंडप संपूर्ण दगडी बांधकामाचे आहे. सभामंडपाचे वरचे छत अर्धवर्तुळाकृती, खोलगट व भव्य स्वरूपाचे आहे. प्रत्येक गुरुपौर्णिमेला मंदिरात सार्वजनिक महोत्सव असतो. मंदिराच्या तळघरात जवळजवळ वर्षभर पाणी असते ते त्या दिवशी काढले जाते आणि तळघर दर्शनासाठी सर्वांना खुले केले जाते. मंदिरात अंगारकी व संकष्टी चतुर्थी तसेच गुरुपौर्णिमेस गर्दी होते. त्रिशुंड गणपती मंदिर हे जागृत देवस्थान समजले जाते.