(मुंबई/किशोर गावडे)
अक्षय नगरे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह विश्रांतवाडी, विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोयता, तलवार, सुरे व धारदार शस्त्रे यासारख्या हत्यारांसह फिरत असताना खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्रासह गंभीर दुखापत करणे, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. तसेच दहशत निर्माण करणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आजपर्यंत तब्बल 76 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशान्वये विश्रांतवाडी पोलिसांनी एमपीडीए कायद्यांतर्गत अक्षय रवि नगरे याच्याविरुद्ध कारवाई केली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी व त्यांची गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांकडून कडक प्रतिबंधात्मक कारवाईचा धडका सुरु केला आहे.
अशातच विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणारा अट्टल गुन्हेगार अक्षय रवि नगरे (वय-23 रा. भिमनगर, विश्रांतवाडी, पुणे) याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. अक्षय नगरे याला एमपीडीए कायद्यान्वये मुंबई मध्यवर्ती कारागृहात एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले आहे. मागील पाच वर्षामध्ये त्याच्याविरुद्ध 5 गंभीर गुन्हे दाखल आहेत.
प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी अक्षय नगरे याच्यावर एमपीडीए अॅक्ट अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले. विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर पी.सी.बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी ही कामगिरी केली.