( रत्नागिरी )
पुणे येथील पुणे भारत गायन समाज आयोजित नटसम्राट बालगंधर्व नाट्यस्पर्धेत रत्नागिरीच्या स्वरा अमित भागवत हिने पहिल्या गटात द्वितीय क्रमांक पटकावला. पुणे येथे स्पर्धेची अंतिम नुकतीच पार पडली. यावेळी ज्येष्ठ गायक रवींद्र घांगुर्डे (पुणे) आणि संगीतकार वर्षा भावे (मुंबई) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
स्पर्धेची प्राथमिक फेरी ऑनलाईन पद्धतीने पार पडली होती. तीन गटात झालेल्या स्पर्धेत भारताबरोबरच ऑस्ट्रेलियातूनही स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. स्वराने ‘तम निशेचा सरला’ हे नाट्यपद सादर केले. स्वरा ही येथील स्वराभिषेक-रत्नागिरी या संगीत वर्गाची विद्यार्थिनी असून सौ. विनया परब यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेत आहे. तसेच ती पोदार स्कूलमध्ये शिकत आहे. या गटात मुंबईची श्रावणी वागळे हिने प्रथम, तर बदलापूरच्या सई जोशीने तृतीय क्रमांक मिळवला. स्पर्धेच्या बक्षीस वितरण पुणे भारत गायन समाज संस्थेच्या समारंभ अध्यक्ष ज्येष्ठ गायिका मधुवंती दांडेकर, परीक्षक रवींद्र घांगुर्डे, आणि उपाध्यक्ष रवींद्र जोशी यांच्या हस्ते पार पडला. रोख पारितोषिक आणि प्रशस्तिपत्र देऊन स्पर्धकांना गौरविण्यात आले.