(जाकादेवी वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मोहिनी मुरारी मयेकर कला वाणिज्य महाविद्यालय चाफे येथे मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेचे संस्थापक व माजी कार्याध्यक्ष आणि मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे माजी चेअरमन मा. कै. डॉ. दिलीप उर्फ नानासाहेब मयेकर यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली कार्यकम शिक्षण संस्थेचे उपक्रमशील व धडाडीचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, कला- क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामाने नावलौकिक संपादन केलेल्या कै. मा.डॉ. दिलीप उर्फ नानासाहेब मयेकर यांच्या देदीप्यमान कामगिरीचा आढावा अनेक मान्यवरांनी घेतला. प्रारंभी डॉ. नानासाहेब मयेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार समर्पित करण्यात आला. प्रथम पुण्यतिथीनिमित्त रत्नागिरी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार श्री. बाळासाहेब माने, जि. प. माजी उपाध्यक्ष सतिश शेवडे, कुमार शेट्ये, रत्नागिरी माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड, बंटी वणजू, बंधू मयेकर, श्रीम.दिप्ती मयेकर, मोहन मयेकर, तसेच नानासाहेबांचे मित्रमंडळ, मयेकर कुटुंबिय, नातेवाईक, शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, मालगुंड-जाकादेवी-काजुर्ली-चाफे या शिक्षण संकुलातील मुख्याध्यापक,सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी, ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी उपस्थित होते.
यावेळी कै. डॉ. नानासाहेब मयेकर यांच्या शैक्षणिक सामाजिक राजकीय कला-क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्राचार्या सौ.स्नेहा पालये, सुगंध कदम, दिलीप कदम, बाबासाहेब बेडक्याळे, अमित बोले, दिलीप बापट, अमित जाधव, शिवानंद गुरव, संकेत देसाई, प्रकाश वंजोळे, मुख्याध्यापक बिपिन परकर, एकनाथ पाटील, अमोल पवार, श्रीशैल्य पुजारी, रोहित मयेकर, विलास राणे, किशोर पाटील, विनायक राऊत, यशश्री पवार, कुमार शेट्ये, सतिश शेवडे, माजी आमदार बाळासाहेब माने तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष बंधू मयेकर इत्यादीनी गुणगौरव केला.
डॉ.नानांची मैत्री, आपुलकी, धाडस, तसेच नानांचे शैक्षणिक सामाजिक राजकीय कला-क्रीडा क्षेत्रातील कार्य अनेकांना प्रेरणादायी असून अनेक पैलूंचा उल्लेख मान्यवरांनी केला.नानासाहेब यांच्या उत्तुंग कार्याचा गौरव केला.नानांनी समाजातील गोरगरीबांना केलेली मदत, खेळाडूंसाठी दिलेले योगदान आणि मोठ्या धाडसाने उभारलेल्या शाळा महाविद्यालयांमुळे नानांचे कार्य अजरामर राहिले असल्याचे प्रमुख मान्यवर मंडळींनी यावेळी अधोरेखित केले.मनोगतप्रसंगी नानांच्या आठवणींने नानांचे सुपूत्र रोहित मयेकर यांचे मन भरून आल्याने अनेकांचे डोळे पाणावले. बाळासाहेब माने,सतिश शेवडे, कुमार शेट्ये, नरेंद्र गावंड बोलताना म्हणाले की, डॉ. नानांची मैत्री नि नानांनी केलेले समाजपयोगी कामे यातूनच अनेकांनी प्रेरणा घेऊन नानांचे उर्वरित स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध होण्याची गरज असल्याचे सांगून नानांच्या गुणवैशिष्ट्यांवर त्यांनी प्रकाशझोत टाकला. विशेष: आम्हाला शक्य झाले नाही ते नानांनी कष्टकरी-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सिनिअर कॉलेज साकार करून अशक्य ते शक्य करून दाखवले. नानांकडे असलेली जिद्द, संघटन कौशल्य व संघर्ष करण्याची ताकद यातूनच ते सर्व क्षेत्रात यशस्वी ठरले.मयेकर कुटुंबीयांनी पदरमोड करून समाजासाठी केलेल्या कार्याचा गौरव करुन प्रमुख मान्यवर मंडळींनी नानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
डॉ.नानासाहेब मयेकर यांच्या नावाने दत्तक पालक योजना सुरू करत असल्याचे मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनिल मयेकर यांनी जाहीर करून ज्या विद्यार्थ्यांचे कोरोना महामारीत पालक मृत्यू पावले,अशा गरजू विद्यार्थ्यांना संपूर्ण शिक्षण हे मोफत देण्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच डॉ.नानासाहेब मयेकर दत्तक विद्यार्थी योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती खूपच गरिबीची आहे,अशा विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळेपासून ते महाविद्यालयीन शिक्षण पूर्णतः मोफत देण्याची घोषणाही बंधू मयेकर यांनी यावेळी केली. नानांनी सुरू केलेले सर्व उपक्रम सक्षमपणे राबविले जातीलच, शिवाय त्यात अधिक भर घालण्यासाठी माझे मयेकर कुटुंबिय व माझी शिक्षण संस्था कटिबद्ध असल्याचे अध्यक्षीय विचार व्यक्त करताना संस्थेचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर यांनी आत्मविश्वासपूर्वक सांगितले.
या पुण्यस्मरण दिनानिमित्त मयेकर महाविद्यालयात पुष्पगुच्छ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शितल संतोष गावडे, द्वितीय क्रमांक पवन सुनिल माचिवले, तृतीय क्रमांक सोनाली चंद्रकांत भातडे इत्यादी हस्तकलाकारांचा
या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. प्रथम क्रमांकाचा पुष्पगुच्छ नानांच्या प्रतिमेस अर्पण करण्यात आला. डॉ. नानासाहेबांचे हितचिंतक,नातेवाईक, समाजिक व राजकीय स्तरावरील अनेक मान्यवरांसह शिक्षक वर्गानेही नानांच्या दातृत्वाचे व नेतृत्वाचे अनेक वास्तववादी प्रसंग उभे करुन मनातील नानांविषयीच्या आठवणी जाग्या केल्या.
सूत्रसंचलन उपप्राचार्य गणेश कुळकर्णी यांनी केले.या कार्यक्रमाला मालगुंड,जाकादेवी, चाफे, तालुक्यातून मयेकर कुटुंबिय, नातेवाईक, अनेक शिक्षण संस्थांचे मान्यवर पदाधिकारी, संचालक, सल्लागार, शिक्षणप्रेमी, ग्रामस्थ, विद्यार्थी, हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.