(पुणे)
पुणे- सातारा महामार्गावर कंटेनर व दोन बसमध्ये झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार झाले असून मृतांमध्ये एका नऊ वर्षीय मुलीचा समावेश आहे. अपघातातील जखमींवर नसरापूर, वेळू, खेड शिवापूर, कापूरहोळ येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात जवळपास ३५ जण जखमी झाले आहेत.
पुण्याच्या दिशेने येत असलेल्या कंटेनरला एका एसटी बसने मागून जोरात धडक दिली. या धडकेत एसटी बस जागेवर उलटली. तर धडक दिलेला कंटेनर हा साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर फेकला गेला. यावेळी पुणेकडून येणारी शिवशाही बस या कंटेनरला धडकली. या विचित्र अपघाताची माहिती मिळताच राजगड पोलीस, महामार्ग पोलीस यांनी धाव घेतली. तसेच तीन क्रेनच्या साह्याने अपघातातील वाहने बाजूला करण्यात आली. जखमींना तातडीने रुग्णलयात दाखल केले. यांनतर तब्बल तीन तासांनी वाहतूक सुरळीत करण्यात आली.
यावेळी महामार्गावर वाहनाच्या लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, महामार्गावरील सेवा रस्ता व पुलाचे काम अर्थवट झाले आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.