पुणे-नाशिक महामार्गावर असणाऱ्या खेड तालुक्यातील शिरोली गावाजवळ सोमवारी रात्री भीषण अपघात झाला. पुण्याकडून येणाऱ्या चारचाकी वाहनाने 17 महिलांच्या घोळक्याला उडवले. या अपघातात पाच महिलांचा जागीच मृत्यू झाला असून 13 महिला जखमी झाल्या आहेत. खरपुडी फाट्याजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशीला देढे, इंदुबाई कोंडीबा कांबळे ( वय 46) अशी दोन मृत महिलांची नावे आहेत. दरम्यान इतर मृतांची नावे समजू शकली नाहीत. या अपघातातील जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घडलेल्या भयानक अपघाताविषयीच्या अधिकची माहितीनुसार, खरपुडी फाट्यावर असणाऱ्या मंगल कार्यालयात या 17 महिला लग्न कार्यक्रमात वाढपी आणि स्वयंपाक कामासाठी आल्या होत्या.
पुण्याच्या वेगवेगळ्या भागातून या महिला आल्या होत्या. मंगलकार्यालय दुसऱ्या बाजूला असल्याने त्या सर्वजणी रस्ता क्रॉस करत होत्या. मात्र पुण्याच्या दिशेकडून आलेल्या एका भरधाव चारचाकी वाहनाने घोळक्याला जोरात धडक दिली. रात्रीच्या वेळी पोलीस जात असताना हा प्रकार समोर आला.
पुण्याकडून नाशिककडे जाणाऱ्या लेनवर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात पाच महिलांचा मृत्यू झाला असून 13 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. या अपघातानंतर वाहन चालकाने रस्ता दुभाजक तोडून वाहनासह तेथून पळ काढला. अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.