(नवी दिल्ली)
इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक बुधवारी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीत इंडिया आघाडीची पहिली सभा ऑक्टोबरमध्ये भोपाळ येथे घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. यासोबतच जागावाटपाची प्रक्रियाही सुरू झाली आहे, अशी माहिती के. सी. वेणुगोपाल यांनी दिली.
इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईमध्ये १ सप्टेंबर रोजी झाली होती. त्याच बैठकीत पुढे केवळ समन्वय समित्यांच्या बैठका होतील, असे ठरले होते. त्यानुसार आज (बुधवारी) दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी समन्वय समितीची बैठक संपन्न झाली. इंडिया आघाडीच्या १४ सदस्यीय समन्वय समितीमध्ये शरद पवार, संजय राऊत यांचा समावेश आहे. बैठकीनंतर केसी वेणूगोपाल यांनी सांगितले की, इंडिया आघाडीतील पक्षांच्या जागावाटपाबाबत प्रक्रिया सुरु झालेली आहे. सहकारी पक्षांशी बोलणी करून याबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल. इंडिया आघाडीची पहिली जाहीर सभा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे, अशी घोषणा वेणूगोपाल यांनी केली. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने इंडिया आघाडी प्रचारदौरे करणार असल्याची माहिती आहे. या बैठकीला तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी यांची उपस्थिती नव्हती.
इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी मंगळवारी उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. मुंबईतल्या पवारांच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांनी तब्बल ९० मिनिटं चर्चा केली. इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक आणि राज्यातली सध्याची राजकीय परिस्थिती यावर चर्चा केल्याचे बैठकीनंतर नेत्यांनी सांगितले. येत्या काळात जागावाटप आणि जाहीर सभांमधून इंडिया आघाडी एकजूट दाखवणार आहे. भोपाळमध्ये पहिली जाहीर सभा होत असून त्यानंतर तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केले जाणार असल्याची चर्चा आहे.