(रत्नागिरी)
खरीप हंगाम २०२२ – २३ साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना ३१ जुलैपर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी असून, योजना ऐच्छिक आहे.
अधिसूचित पिकांसाठी खातेदाराच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत . या योजनेंतर्गत विविध जोखमीच्या कारणांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीस विमा संरक्षण दिले जाणार आहे . ई – पीक पाहणीअंतर्गत पिकांची नोंद करण्यात यावी विमा योजनेत विमा घेतलेले पीक आणि ई -पीक पाहणीमध्ये नोंदविण्यात आलेले पीक यामध्ये तफावतीचा मुद्दा उद्भवल्यास ई – पीक पाहणीमधील पीक अंतिम गृहीत धरण्यात येणार आहे.
या संदर्भात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा , राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा , विविध कार्यकारी सोसायट्या , कृषी सहायक , मंडळ कृषी अधिकारी , तालुका कृषी अधिकारी , उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे यांनी केले आहे .