( दापोली )
कारवरील ताबा सुटल्याने कार झाडावर आदळून अपघात झाला होता. या अपघातात सात महिन्याच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताप्रकरणी कारचालक नौफिल हाशम सारंग (२६) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नौफिल सारंग हा टीयुव्ही 300 (एमएच ४३ बीजी ४६२४) कार घेऊन मुंबईहून दाभोळ येथे येत होता. दापोली तालुक्यातील पिसई गावाजवळ कार आली असता त्याचा कारवरील ताबा सुटला आणि कार रस्त्याच्या बाजूला झाडावर आदळली. यामध्ये हामद सारंग याचा अंत झाला. या गाडीतील अन्य हाशम निशाबुद्दीन सारंग, मनुवट हाशम, तसलिया नौफिल सारंग हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. या अपघातप्रकरणी नौफिल सारंग याच्यावर दापोली पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविला आहे. तपास पोलिस करत आहेत.