(संगमेश्वर)
तालुक्यातील पिरंदवणे येथे काल स्वातंत्र्याचा वर्धापनदिन उत्साहात संपन्न झाला. गावातील जि.प. शाळा क्र.1 तसेच घेवडेवाडी शाळा व निवईवाडी शाळा या ठिकाणी ध्वजारोहण झाले. यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने बालसभेचे आयोजन करण्यात आले होते.
श्रावणी सोमवार असल्याने काल गावातील श्री देव गांगेश्वर मंदिरात समारत्न होते. यानंतर महाप्रसादाचा मोठा कार्यक्रम होतो. यालाच जोडून श्री ग्रामदेवता ट्रस्ट, पिरंदवणे व पिरंदवणे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाचे आयोजन करण्यात आले. श्री. श्रीनिवास पेंडसे यांनी व्याख्यानपुष्प वाहिले. दीपप्रज्वलन व भारतमातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रास्ताविक गावचे पोलीस पाटील श्री. अनिल भामटे यांनी केले. सरपंच श्री. विश्वास घेवडे यांनी पेंडसे यांचे श्रीफळ व पुष्प देऊन स्वागत केले.
श्री. पेंडसे यांनी आपल्या व्याख्यानात अनेक गोष्टींचा उहापोह केला. 1947 पूर्वी जन्मलेल्या लोकांची संख्या आता फार कमी असणार. त्याकाळी झालेल्या फाळणीच्या वेदना यांच्या अंतर्मनात अजूनही असतील. इंग्रज काही कंटाळून गेले नव्हते तर हजारो ज्ञात-अज्ञात लोकांनी भारतमातेसाठी अतुलनीय त्याग केलेला आहे. त्याचाच परिपाक म्हणून आपल्याला स्वातंत्र्याचा उपभोग घेता येत आहे याची आपल्या उरी सदैव जाणीव असावी. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या अगोदर उमाजी नाईक या रामोशी समाजाच्या क्रांतिकारकाने ब्रिटिशांच्या विरुद्ध खंडोबाची शपथ घेऊन लढा उभा केला होता. केवळ 300 ब्रिटिश सुरुवातीस भारतात आले आणि त्यांनी भारताचा सर्व बाजूंनी र्हास केला. सोन्याचा धूर ज्या देशातून निघायचा अशा देशात लोकांची अन्नान दशा झाली. ‘मिलो’ नावाचा तांबडा गहु जो अमेरिकेत गुरांसाठीही वापरला जात नव्हता तो खायची वेळ भारतीयांवर आली या काळात. रत्नागिरीतील अनंत कान्हेरे नामक युवकाला ठाण्यात फासावर लटकावले. इंग्रजांचे अन्याय ऐकून आपल्या डोळ्यांत नक्कीच पाणी तरळेल. देशासाठी मी काहीही करणार नाही; मात्र मी जे काही करेन त्यामुळे देशाची मान खाली जाऊ देणार नाही. अन्नाची नासाडी करणार नाही. अशा भूमिका स्विकारल्यास खूप मोठा सकारात्मक बदल नक्की दिसून येईल.
यानंतर त्यांनी ‘गावाचा शाश्वत विकास हाच राष्ट्राचा शाश्वत विकास’ या विषयाला सुरुवात केली. गावात आपत्कालीन व्यवस्था म्हणून लोखंडी खाट, शौचखुर्ची असावी. शेतकर्यांनी गुलमोहर, निलगिरीसारखी जमिनीत क्षार वाढणाऱ्या झाडांची जोपासना करू नये; जमिनी नापीक होतात. रासायनिक खतांचा वापर टाळावा. त्याऐवजी शेणखत, गांडूळखत इत्यादी खतांचा वापर करावा. कोकणात घाम गाळावा लागत नाही; आम्ही राहतो यातच सर्व काही भरून पावते. मंदिरांचा जिर्णोद्धार नावाचा प्रकार हे एक संकट आहे. देवळांचे जुने स्वरुप अधिक प्रभावी ठरणार याची सत्यता येत्या काळात पडताळून पाहता येईलच. नमन, खेळे इत्यादींमध्ये जुन्या ओव्या विसरून चालणार नाही. आपला वारसा आपणच जपला पाहिजे हेही राष्ट्रकार्यच आहे.
शिवछत्रपती हा जयंती-पुण्यतिथी वा राजकारणापुरता मर्यादित विषय नाही तर तो अभ्यासाचा आणि आचरणात आणण्याचा विषय आहे. यासाठी शिवचरित्राचा गावातील तरुणांनी अभ्यास करायला हवा. गाव स्वयंपूर्ण होणे यापुढे आवश्यक आहे. गावकी व भावकीतील वाद सामंजस्याने मिटवावेत. आपण कधीतरी म्हातारे होणार आहोत याची जाणीव करून तरुणांनी विकासासाठी प्रयत्न करावेत तरच वृद्धापकाळ सुकर होईल. सर्वांत महत्त्वाचे देशभक्ती केवळ 2-3 दिवसांपूर्ती मर्यादित न ठेवता ती आपल्या वर्तनातून सदैव प्रतीत व्हावी. अशा प्रकारे श्री. पेंडसे यांनी गावकर्यांचे प्रबोधन केले.
यानंतर गावचे मानकरी श्री. अरविंद मुळे यांनी अध्यक्षीय भाषण करून सर्वांनाच धन्यवाद दिले. व त्यानंतर गावातील ‘हर घर तिरंगा अभियान’ संपन्न झाल्याचे अधिकृतपणे घोषित केले. या कार्यक्रमास गावचे मानकरी, मंदिरातील गावठे, मंदिर प्रशासन सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेविका, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील तसेच गावातील बहुसंख्य ग्रामस्थांनी उपस्थित राहिले. सर्वांनीच कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त करत आयोजकांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात उपस्थितांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.