(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील नवलाई देवी शिमगोत्सवात पावस येथे होळी पडून चंद्रकांत नारायण सलपे (54, पावस, धनगरवाडी) यांचा मृत्यू झाला होता. या मृत्यूप्रकरणी पूर्णगड पोलिस स्थानकात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवाकर गजानन पावसकर, संजय तुकाराम साळंके (पावस), प्रकाश सहदेव पावसकर (रा. कुर्धे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, होळी कार्यक्रमात सुरमाडाची 55 फुट लांबीची व 3 फुट 8 इंच गोलाई असलेली होळी तोडल्यानंतर ही वजनदार होळी उचलण्यास त्रास होईल त्यामुळे होळीची लांबी कमी करुया असे सांगून सुध्दा होळीची लांबी कमी केली नाही, दुर्लक्ष केले. तसेच होळीचा खड्डा काढण्याची व होळी सुरक्षित उभी करण्यासाठी लावलेल्या लाकडी दोन फळया सुरक्षित न लावल्याने होळीचा बुंधा खड्डयात न जाता सुमारे 4 ते 5 फुट पुढे गेला. त्यामुळे लोखंडी पाईपच्या कैचीच्या बोल्ट मधून होळी पडली. ही होळी सलपे यांच्या अंगावर पडून मृत्यू झाला.
नागरिकांनी सांगूनसुध्दा निष्काळजीपणे दुर्लक्ष केल्याने सलपे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.