(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी – पावस मार्गावरील फिनोलेक्स फाटा येथे दुचाकींना कारने धडक दिल्याची घटना ४ जून २०१७ रोजी घडली होती. या अपघातप्रकरणी न्यायालयाने कारचालकाला २ वर्षे सश्रम कारवास व ५ हजार ६०० रूपये दंडाची शिक्षा सुनावली. विश्वेश्वर मुरलीधर लिंगायत (४७, रा. शिरगांव-शिवरेवाडी, रत्नागिरी) असे कारचालकाचे नाव आहे. पूर्णगड पोलिसांकडून लिंगायत याच्याविरुद्ध गुन्हा आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
रत्नागिरी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी माणिकराव सातव यांनी या खटल्याचा निकाल दिला. सरकारी पक्षाकडून अँड. प्रज्ञा तिवरेकर यांनी काम पाहिले. खटल्यातील माहितीनुसार, ४ जून २०१७ रोजी लिंगायत हा इंडिका कार (एमएच- ०८- आर-१२१७) घेऊन पावस ते रत्नागिरी असा भरधाव येत होता. त्याच सुमारास आनंद श्रीधर मयेकर (रा. हर्चे, रत्नागिरी) हा शाईन दुचाकी (एमएच- ०८-टी-६६२२) तर विकास वसंत घवाळी त्यांचा मुलगा वेदांत घवाळी रा. वायंगणी, रत्नागिरी) याला घेत अॅक्टिव्हावरून (एमएच-०८-एसी – २९८८) रत्नागिरीच्या दिशेने येत होते. तीनही वाहने सायंकाळी ४ च्या सुमारास फिनोलेक्स फाटा येथे आली असता विश्वेश्वर लिंगायतने डाव्या बाजूला जाऊन शाईनला तसेच पुढील अॅक्टिव्हा गाडीला धडक देत अपघात केला होता.
या प्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात लिंगायत याच्याविरूद्ध भादंवि २७९, ३३७, ३३८ व मोटारवाहन कायदा कलम १८४, १३४, १७७, १४६, १९६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला. न्यायालयापुढे दोषारोप सिद्ध झाल्याने न्यायाधीश सातव यांनी शिक्षा सुनावली. गुन्ह्यात तपासिक अंमलदार म्हणून तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक पांचाळ तर पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार दुर्वास सावंत आणि महेश मूरकर यांनी काम पाहिले.