(ज्ञान भांडार)
वीज पडणे ही नैसर्गिक घटना असून, ती जगभरात सर्वच ठिकाणी होत असते. वीज पडण्यापूर्वी जेव्हा वातावरण निर्मिती होत असते, अशा वेळी जर सुरक्षिततेच्या बाबींचे पालन केले तर अशा घटनांमुळे होणाऱ्या जीवित व वित्त हानीचे रक्षण करता येऊ शकते. आकाशातील वीज ही आपल्या घरातील विद्युत प्रवाहासारखी आहे, त्याची तीव्रता त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त असते. मान्सुन सक्रीय होण्याच्या एक महिना अगोदर अवकाळी आणि पूर्व मौसमी पावसाच्या काळात वीज कोसळण्याचे प्रकार सर्वाधिक घडतात.
पृथ्वीवर केवळ 5 टक्के वीज पडत असतात. त्यापैकी 95 टक्के वीज ढगातच लुप्त होतात. वीज तीन प्रकारची असते. म्हणजे जी वीज ढगातल्या ढगात तयार होते त्याचा आवाज जास्त प्रमाणात येत नाही. दुसरा विजेचा प्रकार म्हणजे वीज एका ढगाकडून दुसऱ्या ढगाकडे जात असतांना दिसते. ढगांचे थोडाफार घर्षण होते व आपल्याला आवाज ऐकू येतो. तिसरा प्रकार म्हणजे ढगापासून ते जमिनीपर्यंत वीज पडणे. पृथ्वीवर येणारी वीज खूप धोकादायक असते. ती पृथ्वीवर जीव वित्त सृष्टीला हानी पोहोचू शकते.
पाऊस पडण्याच्या आधी आकाशात ढग जमतात आणि काही मिनिटात गडगडाटी वादळासह विजा चमकतात आणि मोठ्या आवाजासह कुठेतरी पडतात. याच कालावधीत शिवारात मशागतीची तयारी सुरु असते. त्यावेळी शेतात कामे करीत असलेल्या शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा आणि जनावरांचा वीज पडून मृत्यू झाल्याच्या अनेक दुर्दैवी घटना दरवर्षी घडत असतात. शासकीय सर्वेक्षणानुसार दरवर्षी सुमारे 2500 व्यक्तींचा मृत्यू वीज पडल्यामुळे होत असतो.
मेघ गर्जना आणि वीज, वादळ होत असताना :
अचानक वादळी वातावरण निर्माण झाल्यावर मोठ्या आणि उंच झाडाखाली उभे असताना हा धोका जास्त असतो. वीज शक्यतो उंचीच्या ठिकाणी कोसळते.
छत्र्या कोयते, सुऱ्या, गोल्फ खेळण्याची काठी अशा धातूच्या वस्तू जवळ ठेवणे टाळा.
तुम्ही घराबाहेर असाल, तर त्वरीत आसरा शोधा, इमारत हा सुरक्षित आसरा आहे. पण इमारत नसेल तर तुम्ही गुहा, खड्डा किंवा खिंडी सारख्या भागात आश्रय घ्या. झाडे यासाठी कधीच सुरक्षित नसतात. उंच झाडे विजेला स्वतः कडे आकर्षित करतात.
तुम्हाला आसरा मिळाला नाही, तरी परिसरातील सर्वात उंच जागा टाळा.
शक्यतो घरातच राहा. जर वादळाची चाहूल लागली, तर अगदी गरजेचे नसल्यास बाहेर जाणे टाळा.
जेव्हा विजा चमकणे किंवा वादळ खूप जोरात चालू असेल तेव्हा विजेच्या सुवाहकांपासून दूर रहा. उदा. धुराडी, रेडिएटर्स, स्टोव्ह, धातूचे नळ असलेल्या जागा आणि टेलीफोन वगैरे
पाण्यानजीक असल्यास त्यातून तात्काळ बाहेर या, छोटया नावेतून पाण्यातून जात असाल तर काठावर बाहेर या.
जर तुम्हाला विद्युत भारित वाटत असेल, तुमचे केस उभे असतील किंवा त्वचेला मुंग्या येत असतील, तर वीज कोसळण्याची शक्यता आहे. त्वरित जमिनीवर ओणवे व्हा किंवा गुडघ्यात मान घालून बसा.
लक्षात ठेवा. विजेचा प्रकाश आणि आवाज यातील अंतर जितके सेकंद असेल, त्याचा तीनने भागाकार केला असता ज्या ठिकाणी कोसळली तिथेपर्यंतचे अंतर किलोमोटरमध्ये अंदाजे कळू शकते.
विद्युत उपकरणे चालू करून वापरू नका. जसे की – हेअर ड्रायर, विद्युत टूथ ब्रश किंवा विद्युत रेझर, जर विज तुमच्या घरावर किंवा घराजवळ कोसळली, तर तुम्हाला विजेचा धक्का बसू शकतो.
वादळात टेलिफोनचा वापर टाळा. विज टेलिफोनच्या घरावरील तारांमधुन वाहू शकते.
जेव्हा डोक्यावर गडद काळे ढग जमू लागतात, पहिल्यांदा वादळाचा आवाज येतो, तेव्हा सुरक्षित आसरा शोधा.
उंच एकाकी झाडाखाली आसरा घेऊ नका. झाडामुळे तुम्ही कदाचित कोरडे राहाल, पण विजेमुळे होणाऱ्या हानीची शक्यता तिथेच जास्त आहे. पावसामुळे जीवीत हानी होणार नाही, पण विजेमुळे होऊ शकेल. अर्धवट अवस्थेत बांधकाम झालेल्या इमारतीचा आसरा घेऊ नका.
वीज पडणे या पूर्णतः नैसर्गिक प्रक्रियेविषयी काही गैरसमज आहेत :
म्हणजे वीज पडणे हा एक दैवी प्रकोप आहे असे मानले जाते. वस्तूतः वीज पडणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.
पायाळू माणसावर जास्त विजा पडतात- हा समजही चूक आहे. पायाळू व्यक्तीसंदर्भात चुकीच्या समजामुळे पायाळू माणसांना घालण्यात येणाऱ्या धातूच्या कड्यामुळे त्यांच्यावर वीज पडते. विजा चमकत असताना सोबत कुठलीही धातूची वस्तू बाळगू नये.
आपण गर्जनाकारी ढगाखाली असल्यास आपल्या अंगावर वीज पडते- हा समज चुकीचा असून बऱ्याचदा ढगाच्या वरील भागातून वीज पडते आणि ती ढगापासून बऱ्याच (३०-४० किमी अंतरापेक्षा जास्त) अंतरावर पडते. त्यामुळे जरी वादळ आपल्यापासून लांब अंतरावर असेल आणि आपल्यावरील आकाश निळे असेल तरीही सावधगिरी बाळगावी.
वीज एका ठिकाणी फक्त एकाच वेळेस पडते- हाही एक गैरसमज असून वीज अनेक ठिकाणी अनेक वेळेस पडू शकते.
वीज कोसळल्याने प्रभावित व्यक्ती त्वरित मरण पावतो- हा समज चुकीचा असून वीज प्रभावित व्यक्तींचे मृत्यूचे प्रमाण हे फक्त 10 ते 30% आहे. वीज प्रभावित व्यक्तीस त्वरित प्रथमोपचार दिल्यास आपण त्याचे प्राण वाचवू शकतो. वीज प्रभावित व्यक्तीच्या अंगात विद्युत भार (करंट) असतो व त्यास स्पर्श करणे धोकादायक असते. हा एक चुकीचा समज असून वीज प्रभाव कायम राहत नसून त्या व्यक्तीस नंतर स्पर्श करणे धोकादायक नसते.
आकाशात विजा चमकत असताना घ्यावयाची खबरदारी :
– शेतात काम करीत असताना शेताजवळील घराचा त्वरित आसरा घ्यावा.
– शेतातील सुरक्षित ठिकाणाचा आसरा घेतल्यानंतर पायाखाली कोरडे लाकूड, प्लास्टिक, गोणपाट, कोरडा पालापाचोळा ठेवा. दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून तळपायावर बसा.
– पायाव्यतिरिक्त शरीराचा कुठलाही भाग जमिनीला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी.
– ओल्या शेतात अथवा तलावात काम करणाऱ्या व्यक्तींनी तत्काळ कोरड्या व सुरक्षित ठिकाणी जावे.
– पोहणारे, मच्छिमारी करणारे यांनी त्वरित पाण्यातून बाहेर यावे.
– झाडापासून झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे रहावे.
– एखादे उंच झाड (जसे शेतातील बैठकीचे झाड) सुरक्षित ठेवायचे असल्यास, वृक्षाच्या उंच फांदीवर तांब्याची एक तार बांधून तिचे दुसरे टोक जमिनीत खोलवर गाडून ठेवावे.
– पक्के घर हे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. शक्य असल्यास आपल्या घरावर वीज वाहक यंत्रणा बसवावी.
– आपले घर, शेत इत्यादींच्या जवळपास कमी उंचीची झाडे लावावीत.
– जंगलात असाल तर कमी उंचीच्या व दाट झाडांचा आसरा घ्यावा.
– वृक्ष, दलदलीचे ठिकाण तथा पाण्याचे स्त्रोत यापासून शक्यतो दूर रहा.
– मोकळ्या आकाशाखाली असण्यापेक्षा एखाद्या छोट्या (कमी उंचीच्या) झाडाखाली आसरा घ्यावा.
– चारचाकी वाहनातून प्रवास करीत असल्यास वाहनातच रहावे.
विजेचा प्रकाश आणि आवाज यात 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी अंतर असेल तर तुम्हाला विजेपासून धोका आहे. अशावेळी नजीक वीज पडण्याची शक्यता 80% असते.