(पुणे)
राज्यात पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी मान्सून आगमन पुन्हा लांबल्याचे दिसत आहे. अरबी समुद्रात तसेच बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्याची म्हणजे मान्सूनची चाल मंदावली आहे. ४ जून रोजी केरळमध्ये दाखल होणारा मानसून भारतात कधी दाखल होईल, याबाबत अद्याप स्थिती स्पष्ट नसल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे. नव्या अंदाजानुसार या आठवड्याच्या अखेरीस केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे, तर महाराष्ट्रात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून दाखल होईल’, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने जारी केलेल्या विस्तारित अंदाजानुसार, जूनच्या पहिल्या आठवड्याच्या अखेरीस केरळमध्ये मान्सून दाखल होऊ शकतो, तर दक्षिण महाराष्ट्रात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून दाखल होऊ शकतो. व १६ जून ते २२ जून या आठवड्यात मान्सून संपूर्ण राज्य व्यापण्याची शक्यता आहे. मात्र हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसांत राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह मान्सून पूर्व सरी कोसळण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या आधीच्या अंदाजानुसार ४ जून रोजी मान्सूनचे केरळमध्ये आगमन उपेक्षित होते. मात्र अरबी समुद्रात तसेच बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रावाताच्या स्थितीमुळे हे आगमन लांबले आहे. मान्सूनचे केरळातील आगमन हे तेथील १४ केंद्रांवर झालेल्या पावसावर आधारित असते. या चौदाही केंद्रांवर पावसासाठी अनुकूल स्थिती असली तरी केवळ एका केंद्रावरच सध्या पाऊस सुरू आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण पूर्व अरबी समुद्रात तयार झालेली चक्रावाताची स्थिती पुढील २४ तासांत अर्थात मंगळवारी (६, जून) अधिक तीव्र होऊन त्याचे कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होईल. त्यानंतरच्या दोन दिवसांत हे कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडून सरकून दक्षिणपूर्व व लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रात तीव्र बनण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत हे दोन्ही पट्टे उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे त्यानंतरच मान्सूनसाठी चांगली स्थिती तयार होईल.’