( रत्नागिरी )
तालुक्यातील पाली पाथरटचे ग्रामदैवत श्री लक्ष्मीपल्लीनाथ देवस्थानचा वार्षिक शिमगोत्सव आजपासून शुक्रवार दि.३ मार्चपासून सुरू होत आहे. त्यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहामध्ये केले जाते. यामध्ये पालखी सजविणे, देवाला रूपे लावणे, होळी आणणे, पौर्णिमेचा होम, नवस बोलणे-फेडणे यांसारखे धार्मिक कार्यक्रम होतात. तसेच नमनाचा सांस्कृतिक कार्यक्रमही होतो.
पालीच्या श्री लक्ष्मीपल्लीनाथ देवस्थानची शिमगोत्सव नियोजनाची सभा नुकतीच फाक पंचमीला मंदिरामध्ये देवस्थानचे अध्यक्ष व मुख्य मानकरी संतोष नारायण सावंतदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या सभेला देवस्थानचे मानकरी अनंत पालकर, गुरूराज सावंतदेसाई, प्रदीप घडशी, बबन काजरेकर, सुभाष गराटे, चंद्रकांत गुडेकर, विष्णू माईण, रोहित पांचाळ, अनिल धाडवे, गोविंद धाडवे व पाली-पाथरटमधील ग्रामस्थ उपस्थित होते.
शिमगोत्सवाची सुरूवात आजपासून शुक्रवार दि. ३ मार्च रोजी होणार आहे. आज दु.२ ते सायं.६ वा.पर्यंत देवाची पालखी सजविणे, सुशोभित करणे, देवाला रूपे लावणे, सायं.६ वा.पासून ते ७ वा.पर्यंत पूजा, घाट धुपारती आरती, सायंकाळी ७ ते रात्री ११.३० वा.पर्यंत पालखी दर्शन. रात्री ११.३० वा.नंतर श्रींची पालखी खेळविण्यासाठी मंदिराबाहेर प्रांगणात आणणे व खेळविणे, पहाटे पालखीची मंदिर प्रदक्षिणा होऊन होम होईल व पालखी सहाणेवर स्थानापन्न होईल.शनिवार दि.४ मार्च रोजी दु.२ वा. सहाणेवरुण श्री देवाची पालखी व गावकरी नियोजित ठिकाणी होळी आणण्यासाठी जातील,होळी आणून उभी करून पूजा करणे, त्यानंतर रात्री ९.३० वा. होळीजवळ नवस बोलणे व फेडणे. रात्री १०.३० वा. पाली गावच्या सुप्रसिध्द नमनाचा कार्यक्रम होणार आहे. सोमवार दि.६ मार्च रोजी दु.२ वा. सहाणेवरुण श्रीदेव व गावकरी पाथरट,कापडगाव,चरवेली यापैकी नेमलेल्या ठिकाणाहून श्रींची कोकड होळी आणण्यासाठी जातील, सायंकाळी ६वा. कोकड होळी घेवून येतील, त्यानंतर रात्री ९ ते १० वा. श्रींची कोकड होळी गुलालाची उधळण करीत नाचवत खेळवत मोडणे, रात्री १० वा. पौर्णिमेचा होम होईल व होळीच्या शेंड्याजवळ नवस बोलणे व फेडणे कार्यक्रम, रात्रौ १०.३० वा. पाथरट गावच्या सुप्रसिध्द नमनाचा कार्यक्रम होईल. मंगळवार दि.७ मार्च रोजी धुळवडीसाठी ढोल व निशाण जाईल. रविवार दि.१२ मार्च रोजी रंगपंचमी दिवशी सहाणेवर बैठकीत शिंपन्याचा कार्यक्रम होईल व देवाच्या ग्रामफेरीचे नियोजन होईल, त्यानंतर श्री लक्ष्मीपल्लीनाथांचे ज्या ठिकाणी प्रथम आगमन झाले त्या देवाचा आंबा (देवतळे) येथे श्री देवाची पालखी जाईल व गावाची पूजा स्वीकारेल त्यानंतर गादीवर मुख्य मानकरी व खोत संतोष नारायण सावंतदेसाई यांच्या येथे देवाची पालखी जाईल व गादीवरची पूजा स्वीकारेल. त्यानंतर सोमवार दि.१३ मार्चपासून मानाप्रमाणे मानकरी व गावकरी यांच्या घरोघरी जाउन पालखी पूजा स्वीकारेल . त्यानंतर बुधवार दि.२२ मार्च गुढीपाडव्यादिवशी सायंकाळी पालखीची ग्रामफेरी पूर्ण होऊन गादीवर मुख्य मानकरी व देवस्थानचे अध्यक्ष संतोष सावंतदेसाई (खोत) यांच्या घरी पालखी वस्तीला राहील त्यावेळी गादीवरची पूजा, सव्वाशेराचा महानेवैद्य,महाप्रसाद असा कार्यक्रम होईल. रात्री देवासाठी श्रमपरिहार म्हणून पालीच्या गावकरी यांचे नमन होईल.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवार २३ मार्च रोजी गादीवरची गावाची बैठक व गार्हाणं होऊन तेथून ढोलताशांच्या गजरात श्रीदेव लक्ष्मीपल्लीनाथची पालखी मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करेल त्यानंतर गावाचे गार्हाणं होऊन ढोलताशांच्या गजरात श्री लक्ष्मीपल्लीनाथ व पालखीत स्थानापन्न सर्व देवता यांची घाट धुपारतीने पूजा होऊन मंदिरात स्थानापन्न होतील.
तरी सर्व भाविकांनी पालखीत स्थानापन्न श्रीदेव पल्लीनाथ, श्री देवी महालक्ष्मी,श्री देवी नवलाई,श्री देवी महाकाली, श्री देवी पावनाई,श्री देवी जुगाई,श्री करंबेळदेव ,श्री देवी त्रिमुखी माता या देवतांच्या दर्शनाचा व शिमगोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य मानकरी व देवस्थानचे अध्यक्ष संतोष नारायण सावंतदेसाई (खोत) यांनी केले आहे.