(संगमेश्वर)
तालुक्यातील आरवली येथील येथील शेतकरी महादेव भुवड यांच्या मालकीच्या गोठ्याला आग लागल्याने लाखभराचे नुकसान झाले आहे. ग्रामस्थांनी गोठ्यातील गुरांना सोडून दिल्याने मोठा अनर्थ टळला.
आरवली येथील सपाट भुवडवाडीत महादेव गणू भुवड यांच्या मालकीचा गोठा आहे. सकाळी गोठ्याच्या शेजारी पालापाचोळा जाळण्यात आला होता. यातून आगीचा किटळ गोठ्यावर उडून गोठ्याला आग लागली. ही आग लागताच वाडीतील ग्रामस्थांनी गोठ्याकडे धाव घेऊन गोठ्यातील गुरांना सोडून दिले. आगीने रौद्ररूप धारण केल्याने ग्रामस्थांचे आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले व गोठा आगीत भस्मसात झाला.